Aurangabad : ‘माझी कन्या भाग्यश्री’ला साडेआठ कोटींचा निधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

aurnagabd

‘माझी कन्या भाग्यश्री’ला साडेआठ कोटींचा निधी

औरंगाबाद : राज्यातील मुलींचे प्रमाण सुधारण्यासाठी, स्त्री-भ्रूणहत्या रोखण्यासाठी ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजना राबविण्यात येते. एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेसाठी २०२१-२२ या आर्थिक वर्षाकरिता ८ कोटी ५० लाख रुपये निधी वितरणास शासनाकडून मान्यता देण्यात आली.

माझी कन्या भाग्यश्री योजना राज्यात सर्व गटातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबात जन्मलेल्या प्रत्येक मुलीचा जन्म झाल्यापासून मुलगी १८ वर्षाची होईपर्यंत तिला या योजनेचा लाभ मिळणार आहे. मुलींचा जन्मदर वाढविणे, लिंग निवडीस प्रतिबंध करणे, मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे, मुलींच्या आरोग्याचा दर्जा वाढविणे यासाठी एक ऑगस्ट २०१७ च्या शासननिर्णयान्वये सुधारित माझी कन्या भाग्यश्री ही योजना लागू करण्यात आलेली आहे. या निर्णयानुसार माझी कन्या भाग्यश्री या योजनेसाठी २०२१-२२ या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पित तरतुदीमधून हा निधी वितरीत करण्यात आला आहे, अशी माहिती अवर सचिव महेश वरुडकर यांनी पत्राद्वारे दिली आहे.

कधी मिळणार लाभ?

या योजनेंअतर्गत लाभार्थी मुलगी सहा आणि त्यानंतर १२ वर्षाची होईल, तेंव्हा शासनाकडून व्याजाचे पैसे मिळतील. तसेच मुलीचे १८ वर्ष वय पूर्ण होईल, तेंव्हा योजनेची पुर्ण रक्कम मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलगी किमान दहावी पास व अविवाहीत असणे बंधनकारक आहे. या योजनेसाठी मुलगी, आईचे बॅंक खाते उघडण्यात येईल. खात्यातून पैसे काढण्याचा अधिकार केवळ आई व मुलगी या दोघींनाच असणार आहे.

योजनेसाठी पात्रता

एखाद्या कुटुंबात दोन मुलींनंतर पालकांनी नसबंदी केली असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळेल. मुलीच्या जन्मानंतर एकावर्षाच्या आत पालकांना नसबंदी करावी लागेल. दुसऱ्या मुलीच्या जन्माच्या सहा महिन्यांच्या आत नसबंदी अनिवार्य आहे. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे (वार्षिक उत्पन्न ७.५ लाखांपर्यंत) या योजनेसाठी पात्र ठरतील. या योजनेअंतर्गत शासनाकडून मुलीच्या नावाने ५० हजार रुपये बॅंकेत जमा करण्यात येतात. पालकांनी दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर कौटुंबिक नियोजन स्विकारले असेल तर नसबंदीनंतर दोन्ही मुलींच्या नावे २५-२५ हजार रुपये या प्रमाणे खात्यात जमा केले जातात.

loading image
go to top