जुन्या वादातून शेजार्याचा काढला काटा,बापलेकांवर आष्टी पोलिसांत गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

आष्टी : जुन्या वादातून शेजार्याचा काढला काटा,बापलेकांवर आष्टी पोलिसांत गुन्हा

आष्टी : तालुक्यातील वाळुंज येथे बुधवारी संशयास्पदरित्या आढळलेल्या मृतदेहाच्या खुनाचे गूढ उकलण्यात आष्टी पोलिसांना यश आले आहे. जुन्या वादातून शेजार्यांनीच शेजार्याचा काटा काढल्याचे स्पष्ट झाले असून, या प्रकरणी बाप-लेकांसह तिघांवर आष्टी पोलिसांत बुधवारी (ता. 20) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तात्रय भैरवनाथ गावडे (वय 55 वर्षे, रा. वाळुंज) असे मृताचे नाव आहे. याबाबतची माहिती अशी की, तालुक्यातील वाळुंज येथे राहणारे दत्तात्रय भैरवनाथ गावडे यांचा मृतदेह बुधवारी वस्तीजवळील मक्याच्या शेतात आढळून आला होता. प्राथमिक तपासात पोलिसांना खुनाचा प्रकार असल्याचे पुरावे मिळाले होते. तसेच कुटुंबीयांनीही घातपाताचा संशय व्यक्त केला होता.

दरम्यान, मंगळवारी (ता. 19) घराबाहेर पडलेले गावडे घरी परतले नाहीत. बुधवारी सकाळी गावाशेजारील शेतात गावडे यांचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले. पाहणीत मृतदेहाजवळ रक्ताने माखलेल्या विटा आढळून आल्या. श्वानपथकाने शेजार्यांच्या घरापर्यंत माग काढला होता. पोलिस तपासात गावडे यांच्या शेजारील खाडे कुटुंबाची चौकशी केली असता विसंगत उत्तरे मिळाली. त्यानंतर तिघे खाडे बापलेक फरारी झाले.

तपासात सहा महिन्यापूर्वी झालेल्या किरकोळ वादातून तिघा बापलेकांनी शेजा-याचा विटांनी ठेचून खून केल्याचे निष्पन्न झाले. शेजारी राहणारे विश्वनाथ मुरलीधर खाडे, अमोल विश्वनाथ खाडे, अजय विश्वनाथ खाडे या बापलेकांसोबत सहा महिन्यापूर्वी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. यावरून खाडे पितापुत्र रागात होते. त्यामुळे त्यांनी शेजार्याचा काटा काढला.

यासंदर्भात मृताचा भाऊ दिगंबर भैरवनाथ गावडे यांच्या फिर्यादीवरून विश्वनाथ मुरलीधर खाडे, अमोल विश्वनाथ खाडे, अजय विश्वनाथ खाडे या बापलेकांवर बुधवारी रात्री उशिरा आष्टी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनास्थळी आष्टीचे उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजित धाराशीवकर, प्रभारी पोलिस निरीक्षक विजय देशमुख यांनी पाहणी केली. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी करीत आहेत.

Web Title: Neighbor Old Dispute Crime Ashti Police Against Father Son Mystery Murder Walunj

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top