esakal | सौरऊर्जेसाठीही, महावितरणची कटकट कायमच 
sakal

बोलून बातमी शोधा

photo

- जिल्ह्यात सतराशे कनेक्‍शन 
- साडेपाच मेगावॉटची निर्मिती 

सौरऊर्जेसाठीही, महावितरणची कटकट कायमच 

sakal_logo
By
अनिलकुमार जमधडे

औरंगाबाद : विजेच्या भरमसाट वाढणाऱ्या बिलामधून मुक्ती मिळण्यासाठी सोलर पॉवर प्लॅंटची (रूफ टॉप सोलर सिस्टीम) मागणी वाढली आहे. जिल्ह्यात एक हजार ७३३ ग्राहकांनी सोलर पॉवर प्लॅंट बसवले आहेत. यातून साधारण ३९ लाख युनिटची निर्मिती होत असून, साधारण साडेपाच मेगावॅटची गरज भागवली जात आहे. असे असले तरीही सोलर बसवताना मात्र महावितरणकडून प्रचंड त्रास होत असल्याच्या तक्रारी आहेत. 
जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ७३३ घरगुती आणि औद्योगिक वापर करणाऱ्या ग्राहकांनी सोलर पॉवर प्लॅंट बसविले आहेत. यामधून प्रत्येक महिन्याला ३.९६ मिलियन युनिट म्हणजेच ३९ लाख ६० हजार युनिट (साडेपाच मेगावॅट) वीज उत्पादन केली जात आहे. म्हणजेच सध्या ७० ते ९५ हजार रुपये एक किलोवॅट या दराने सोलार पॉवर प्लॅंट उपलब्ध आहेत. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

काय करावे लागते? 

साधारण सात किलोवॅट क्षमतेपर्यंतच्या सोलरसाठी महावितरणच्या सबडिव्हिजनल कार्यालयाकडून परवानगी मिळते. त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या सोलरसाठी महावितरणच्या परिमंडळ कार्यालयाकडे जावे लागते. ग्राहकाचा मंजूर भार (लोड) जितका आहे, तितक्‍याच सोलर पॉवर प्लॅंटची परवानगी मिळते. 

महावितरणची मात्र कटकटच 

पर्यावरणाच्या दृष्टीने सौरऊर्जेला प्राधान्य देण्याचे शासनाचे धोरण कागदावरच आहे. दुसरीकडे सौरऊर्जेला कुठेही प्रोत्साहन दिले जात नाही. उलट यासाठी केंद्र शासनाकडून दिले जाणारे अनुदान बंद करण्यात आलेले आहे. पूर्वी ही योजना मेडामार्फत (महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण) चालवली जात होती. आता मात्र अनुदान बंद करून ही यंत्रणा महावितरणकडे दिलेली आहे. सोलार पॉवर प्लॅंट (रूफ टॉप सोलर सिस्टीम) बसवण्यासाठी महावितरणकडे पाठपुरावा करताना दमछाक होत आहे. महावितरणकडे सुरवातीला लोड वाढवून घेणे, सोलरचे रजिस्ट्रेशन करणे, फिजिबिलिटी मिळवणे, ॲप्रुव्हल घेणे, मीटर टेस्टिंग करून घेणे, ॲग्रिमेंट करणे, नेट मीटर बसवणे अशा प्रत्येक कामासाठी महावितरणकडे चकरा माराव्या लागतात. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठीक्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

महावितरणकडे मारा चकरा 

महावितरणच्या माध्यमाने रूफ टॉप सोलर सिस्टीम घेण्यासाठी महावितरणच्या कार्यालयात किमान दहा ते पंधरा चकरा माराव्या लागतात. मुळात अधिकारीच जागेवर सापडत नाहीत. सापडले तर उद्या या, परवा या हे ठरलेली उत्तरे असतात. महावितरणच्या अधिकाऱ्यांना त्यांची मूळ कामे सांभाळून सोलरचीही कामे करावी लागतात. नागरिकांना मात्र चकरा मारताना अक्षरशः दमछाक होत आहे. त्यामुळेच सोलरच्या कामासाठी स्वतंत्र अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करून विनाकटकट काम होण्यासाठी एक खिडकी योजना केली पाहिजे, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. 


पर्यावरण आणि देशाच्या हिताच्या दृष्टीने सोलर सिस्टीमचा वापर आवश्‍यक आहे. सोलर सिस्टीमचा वापर वाढला तर विजेची बचतही होणार आहे. सोलर परवानगीसाठी नागरीकांना त्रास होणार नाही यासाठी लक्ष दिले जाईल
- बिभीषण निर्मळ (अधीक्षक अभियंता) 

रूफ टॉप सोलर बसवण्यासाठी नागरिकांना महावितरणकडे सारख्या चकरा माराव्या लागतात. महावितरणमध्ये सहजपणे काम झाले पाहिजे, यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन कामकाज सुलभ करण्याची गरज आहे. 
- प्रकाश त्रिभुवन (सोलर विक्रेता) 
 

 

loading image
go to top