निलजगाव टू बोकूड जळगाव व्हाया

बारावी परीक्षेत केंद्र बदलाचा ‘खेळ’ : अवघ्या काही तासांत दोनदा बदल
Niljagaon to Bokud Jalgaon Change in exam center of12th exam aurangabad
Niljagaon to Bokud Jalgaon Change in exam center of12th exam aurangabadsakal

औरंगाबाद : बारावी परीक्षेत इंग्रजीच्या पहिल्याच पेपरला निलजगाव येथील लक्ष्मीबाई विद्यालय केंद्रावर मंडपात परीक्षा घेण्यात आली होती. त्यामुळे शिक्षण विभागाने कारवाई करत तेथील विद्यार्थ्यांना बिडकीन केंद्र दिले होते. मात्र, अवघ्या काही तासांतच पुन्हा केंद्र बदल करत बोकूड जळगाव येथील श्रीराम उच्च माध्यमिक केंद्र दिल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे चार मार्चपासून बारावीची परीक्षा घेण्यात येत आहे. परंतु, इंग्रजीच्या पहिल्याच पेपरला निलजगाव येथील केंद्रावर भौतिक सुविधांचा अभाव आढळून आला. या केंद्रावर शाळेच्या छतावर मंडप टाकण्यात आला होता. दरवाजे, खिडक्या, स्वच्छतागृह, वीज, पंखे अशीही कुठलीही सुविधा केंद्रावर नव्हती. तीव्र उन्हाच्या झळा सहन करत विद्यार्थ्यांनी पेपर सोडविला. याबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर शिक्षणाधिकारी कार्यालयाने केंद्र मान्यता रद्द करण्याची शिफारस केली. परीक्षा केंद्र रद्द करून तेथील विद्यार्थ्यांची सोय तातडीने बिडकीन येथील सरस्वती भुवन केंद्रावर केली जाईल, असे जाहीर केले. या केंद्रावर परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना बिडकीन येथे घेऊन जाणे, आणणे सर्व जबाबदारी लक्ष्मीबाई विद्यालयाची असेल, असे लेखी घेण्यात आले होते. त्यामुळे बिडकीन येथे विद्यार्थ्यांच्या परीक्षेची तयारी सुरू करण्यात आली होती. परंतु, मंगळवारी (ता.नऊ) सायंकाळी परीक्षा केंद्रात पुन्हा बदल करण्यात आल्याचे पत्र काढले. यावेळी विद्यार्थ्यांना बोकूड जळगाव येथील केंद्र देण्यात आले.

पालकांनी दिले निवेदन

परीक्षेसाठी निलजगाव केंद्र बदल केल्यानंतर ग्रामसंसद कार्यालय जांभळी व निलजगाव ग्रामपंचायतीने बोर्डाला निवेदन दिले. निवेदनात म्हटले की, विद्यार्थ्यांना पुढील परीक्षेसाठी बिडकीन येथील सरस्वती भुवन आठ किलोमीटर दूर पडत आहे. सध्या बससेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या प्रवासाची गैरसोय होऊ शकते. परिणामी, परीक्षेपासून विद्यार्थी वंचित राहू शकतात. गावात जिल्हा परिषद प्रशालेची इमारत असून नऊ वर्गखोल्या आहेत. त्यामुळे लक्ष्मीबाई विद्यालयातील विद्यार्थ्यांची परीक्षा जिल्हा परिषद प्रशालेत घेण्यात यावी, असे निवेदने निलजगाव व जांभळीतून देण्यात आले होते. दोन्ही निवेदन ‘सेम टू सेम’ असल्याने चर्चेला उधाण आले आहे.

काही प्रश्‍न

निलजगावपासून बिडकीन आठ; तर बोकूड जळगाव सात किलोमीटर आहे. औरंगाबाद-पैठण रस्त्यावरील मोठे शहर असल्याने विद्यार्थ्यांना येण्या-जाण्यासाठी गावातून मोठ्या प्रमाणात वाहने उपलब्ध आहेत. तसेच शिक्षणाधिकाऱ्यांना शाळेने लिहून दिले होते की, मुलांना परीक्षा वेळेत ने-आण करण्याची जबाबदारी घेण्यात येईल. असे असताना बोकूड जळगाव येथील केंद्र का देण्यात आले? निलजगाव ते बोकूड जळगाव वाहतुकीची सुविधा जास्त प्रमाणात नसताना या केंद्राला बोर्डाने का प्राधान्य दिले? वारंवार केंद्र बदलाच्या निर्णयामुळे अनेक प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com