esakal | हाताला काम नाही, मायबाप सरकारने मदत द्यावी; केंद्रीय पथकाकडे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

Central Team Visits Heavy Rain Villages In Aurangabad District

साहेब देवाने तर आमचे ऐकले नाही आता तुम्ही आले आहे. अतिवृष्टीने हातातोंडाशी आलेला घास हिरावला.

हाताला काम नाही, मायबाप सरकारने मदत द्यावी; केंद्रीय पथकाकडे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची मागणी

sakal_logo
By
नानासाहेब जंजाळे

शेंदूरवादा (जि.औरंगाबाद) :  साहेब देवाने तर आमचे ऐकले नाही आता तुम्ही आले आहे. अतिवृष्टीने हातातोंडाशी आलेला घास हिरावला. खरिपाचे सर्वच पीक तर उद्ध्वस्त केले असून उसनवारी बँकेची उंबरठे झिजवत कर्ज काढून रब्बीची पेरणी चालू आहे. यापूर्वीही दौरे केलेत. आता आमच्यासाठी तुम्हीच काही तरी करा, अशी आर्त हाक शेतकऱ्यांनी अतिवृष्टी नुकसान पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकासमोर मांडले. सोमवारी (ता.२१) अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसान परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने गंगापूर तालुक्यातील मुरमी आणि ढोरेगाव गावाना भेटी दिल्या.

या भेटी दरम्यान त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. अतिपावसामुळे जनावरांचा चारा काळा पडल्याने जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न आहे. हाताला काम नाही. मायबाप सरकारने भरीव मदत देऊन आत्महत्या न करता शेतकरी जगला पाहिजे. यासाठी काहीतरी करा ही मागणी यावेळी शेतकऱ्यांकडून करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचे सहसचिव, केंद्रीय अर्थ विभागाचे सल्लागार, विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण, उपविभागीय अधिकारी माणिक अहिर, तहसीलदार अविनाश सिंगटे, मंडळ मंडळाधिकारी बाळासाहेब खेडकर, कृषी सहायक अशोक म्हस्के, उषा वाघमोडे, शेतकरी संजय मस्के, विक्रम राऊत, राजू मंजुळे, युसुब सय्यद, गोरखनाथ बनकर यांच्यासह इतर अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.सुनील केंद्रेकर यांनी निभावली दुभाषिकाची भूमिका
यावेळी केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांना मराठी भाषा येत नसल्याने व शेतकऱ्यांना हिंदी व इंग्रजी बोलता येत नसल्याने शेतकऱ्यांनी मराठीत मांडलेल्या व्यथा स्वतः विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी अतिशय चांगल्या प्रकारे पथकाला समजेल अशा हिंदी व इंग्रजीमधून सांगून दुभाषिकाची भूमिका निभावली.

संपादन - गणेश पिटेकर

loading image