esakal | उमरग्यात कोरोनाबाधित मृतांच्या आकडेवारीचा ताळमेळ जमेना! वीस दिवसात ४४ मृत्यु
sakal

बोलून बातमी शोधा

उमरग्यात कोरोनाबाधित मृतांच्या आकडेवारीचा ताळमेळ जमेना! वीस दिवसांत ४४ मृत्यु

उमरग्यात कोरोनाबाधित मृतांच्या आकडेवारीचा ताळमेळ जमेना! वीस दिवसांत ४४ मृत्यु

sakal_logo
By
अविनाश काळे

उमरगा (जि.उस्मानाबाद) : एप्रिल महिन्याच्या वीस दिवसांत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तीची संख्या पालिकेच्या दफ्तरी ४४ आहे तर उपजिल्हा रुग्णालयातील सरकारी कोविड सेंटरमध्ये मृत्यूच्या नोंदी निम्म्याच आहेत. दरम्यान खासगी कोविड रुग्णालयात मृत्यु झालेल्या बहुतांश रुग्णांची गणती सरकारी कोविड सेंटरला झाली नसल्याने मृत्युचा अचूक आकडा प्रशासनाकडून प्राप्त होत नाही.

उमरगा शहर व तालुक्यात कोरोना संसर्गाचा वेग चौपटीने वाढल्याने एप्रिल महिन्यात बाधितांची संख्या वाढली आहे. १९ एप्रिलपर्यंत ८८९ बाधितांची संख्या होती. २० एप्रिलला उपजिल्हा रुग्णालयातील रॅपिड चाचणीत चाळीस पॉझिटिव्ह आले आहेत. सांयकाळपर्यंतच्या अहवालानुसार वीस दिवसात हा आकडा एक हजाराकडे सरकतोय. दरम्यान संसर्ग हा हवेतुन पसरतोय असा निष्कर्ष कांही तज्ञाकडून व्यक्त केला जातोय ; तरीही नागरिकांची बाहेर फिरण्याची मानसिकता अजुन कमी झालेली नाही.

मृत्यूच्या आकडेवारीत तफावत !

एप्रिल महिन्यात तब्बल ४४ मृत्यू झाल्याची नोंद पालिकेच्या दप्तरी आहे. त्यात मंगळवारी (ता.२०) मृत्यू झालेली संख्या सहा आहे. त्यातील एक मृत्यू हा निगेटिव्ह व्यक्तीचा असल्याचे उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. उपजिल्हा रुग्णालयातील नोंदीत वीस जणांचा मृत्यू असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे मृत्यूच्या नोंदीत मोठी तफावत असल्याचे दिसून येत आहे. खासगी कोविड सेंटरमध्ये मृत्यु झालेल्या व्यक्तीचे पत्र पालिकेकडे पाठविले जाते, शिवाय उपजिल्हा रुग्णालयालाही पत्र दिले जाते. मात्र उपजिल्हा रुग्णालय प्रशासन पत्र प्राप्त झाले नसल्याचे सांगते. म्हणजे नेमके दोष कुणाचा ? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात असून मृत्यूच्या आकडेवारीची तर लपवाछपवी  केली जात नसावी, अशी शंका घेण्यास वाव आहे. दरम्यान सरकारी कोविड व खाजगी कोविड सेंटरमध्ये समन्वय नसल्याने बऱ्याच बाबतीत स्पष्टता दिसत नाही. शिवाय सरकारी कोविड सेंटरच्या रिपोर्टिंगमध्येही अचूकपणा दिसत नाही. या सर्व यंत्रणेवर नियंत्रण असणारे महसूल प्रशासनाने या बाबीकडे लक्ष असायला हवे.

loading image