esakal | कोरोनाबाधिताचा मृतदेह रुग्णालयाच्या दारातच पडून, कोणी येईना मदतीला!!

बोलून बातमी शोधा

Dead-Body
कोरोनाबाधिताचा मृतदेह रुग्णालयाच्या दारातच पडून, कोणी येईना मदतीला!!
sakal_logo
By
टीम ई सकाळ

तेर (जि.उस्मानाबाद) : उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे सोमवारी (ता.तीन) दुर्दैवी घटना घडली. कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाल्यास काय होते? माणुसकीही हरवल्याचे दिसले. किणी येथील छगन सोनटक्के (वय ६५) हे तब्येत बिघडल्याने तेर येथील खासगी दवाखान्यात (Ter Rural Hospital) उपचार घेण्यासाठी आले होते. परंतु त्यांची ऑक्सिजन पातळी कमी असल्याने डाॅक्टरांनी त्यांना शासकीय ग्रामीण रूग्णालयात जाण्यास सांगितले. ते खासगी दवाखान्यासमोरच पायरीवर कोसळले व त्यातच त्यांचा मुत्यू झाला. यावेळी या घटनेची माहिती ढोकी पोलिसांना (Dhoki Police Station) देण्यात आली. यावेळी पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर या रूग्णाची तेरच्या ग्रामीण रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी खासगी दवाखान्यासमोर रॅपिड अँन्टीजेन टेस्ट केली. (Osmanabad Latest News Corona Patient Dead Body Lay At Hospital Door)

हेही वाचा: दिलासादायक! औरंगाबाद येथील रुग्णसंख्येत आणखी घट

ग्रामीण रूग्णालयानेही त्या व्यक्तीचा मृत्यू रूग्णालयाबाहेर झाल्याने मदत करण्यास नकार दिला होता. नंतर रॅपिड टेस्टमध्ये सोनटक्के कोरोना पाॅझिटीव्ह आढळून आले. विशेष म्हणजे कोरोनाच्या टेस्टनंतर तब्बल पाच तास सोनटक्के यांचा मृतदेह बेवारस अवस्थेत पडून होता. त्यामुळे नागरिकांसह नातेवाईकांमधून प्रशासकीय यंत्रणेच्या ढिसाळ व नियोजन शुन्य कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला जात होता. दोन ग्रामपंचायतीच्या हद्दी वादात मृतदेह पाच तास पडून राहिला. सोनटक्के किणीचे असल्याने तेर ग्रामपंचायतीने असमर्थता दर्शवली, तर किणी ग्रामपंचायतीने तर नकारच दिला होता. शेवटी किणी ग्रामपंचायतीच्या सरपंचानी जबाबदारी घेतली. यावेळी दोनच्या सुमारास नातेवाईकांच्या मदतीने तेर ग्रामीण रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मृतदेह किटमध्ये घातले. हा सर्व प्रकार पाच तासांपासून सुरु होता.

हेही वाचा: कोरोना तपासण्यांची संख्या वाढवा, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आदेश

दरम्यान एवढ्यावरच ही मृतदेहाची हेळसांड थांबली नाही. यावेळी मृतदेह घेऊन जाण्यासाठी नातेवाइकांना साधे खासगी वाहन सुद्धा लवकर उपलब्ध झाले नाही. तेर ग्रामपंचायतीच्या घंटागाडीत हा मृतदेह किणी येथे पाठविण्यात आला. तब्बल पाच तासापर्यंत हा किळसवाणा प्रकार चालूच होता. शेवटी मृतदेह किणी ग्रामपंचायतीच्या ताब्यात अंत्यसंस्कार करण्यासाठी देण्यात आला. यावेळी किणी येथे सोनटक्के यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत असल्याने माणूस माणसाच्या मदत करण्यासही असमर्थ ठरत असल्याचे सोमवारच्या (ता.तीन) घटनेने दिसून आले. तेर ग्रामीण रूग्णालयाकडूनही नागरिकांनी कोणताही आजार अंगावर काढू नये. रूग्णालयात येऊन उपचार घ्यावेत असे आवाहन केले आहे.