esakal | उस्मानाबाद जिल्ह्याला मिळणार आज साडेपाचशे रेमडेसिविर इंजेक्शन

बोलून बातमी शोधा

remdesivir
उस्मानाबाद जिल्ह्याला मिळणार आज साडेपाचशे रेमडेसिविर इंजेक्शन
sakal_logo
By
तानाजी जाधवर

उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये साडेपाचशेच्या जवळपास रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा बुधवारी (ता.२८) संध्याकाळी उपलब्ध होत आहे. वेगवेगळ्या कोविड सेंटर येथील मेडिकलसह खासगी मेडिकलमध्येही मोठा साठा उपलब्ध होत असल्याने काही प्रमाणात रुग्णांच्या नातेवाईकांना दिलासा मिळाला आहे. यामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या चैत्राली मेडिकल येथे ६० व्हायल्स, जगदंब मेडीलल ९६, अमित डिस्ट्रीब्युटर्स १२०, भन्साळी मेडिकल १८, निरामय मेडिकल २०, गांधी मेडीकल स्टोअर्स ९६ यासह अन्य उमरगा येथील तिरुपती डिस्ट्रीब्युटर्स येथेही १८ व्हायल्स उपलब्ध होणार असल्याची माहिती अन्न औषध प्रशासनाच्या वतीने दिली आहे.

हेही वाचा: औरंगाबाद पालिका निवडणूक : शपथपत्र दाखल करण्यास चार आठवड्यांची मुदत

जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्णांची संख्या वाढली असुन त्यातही गंभीर रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. गंभीर रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शनची गरज भासत असून त्यांना ते इंजेक्शन मोठ्या प्रयत्नानंतरही मिळत नसल्याची ओरड सूरु आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी साठा उपलब्ध झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने यावर नियंत्रण ठेवणारी समिती गठित केली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये इंजेक्शनचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात होत असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे गरज असणाऱ्या रुग्णांना अधिकचे पैसे लागू नये यासाठी एक वॉर रुम तयार करण्यात आली आहे. त्या ठिकाणी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिपशनशिवाय हे इंजेक्शन देता येणार नाही असे सांगितल्याने अनावश्यक वापर थांबण्यास मदत झाली आहे. ज्यांना इंजेक्शन आवश्यक आहे. त्यांनी डॉक्टरांच्या चिठ्ठी घेऊन त्याची नोंदणी केल्यानंतर साठा उपलब्ध झाल्यास त्यांच्याकडुन इंजेक्शन मिळण्याची सोय केली आहे. मात्र काही दिवासांपासुन इंजेक्शनचा पुरवठाच होत नसल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा: सुखद! सात महिन्याच्या बाळासह दोन मुलींनी केली कोरोनावर मात

मंगळवारी संध्याकाळी जिल्ह्यासाठी पुरवठा करण्यात आला असुन तो जिल्ह्यात बुधवारी संध्याकाळपर्यंत प्राप्त होणार आहे. साहजिकच त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना यातुन काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. खासगी मेडिकलसह कोविड केअर सेंटरच्या मेडिकलमध्ये हा साठा उपलब्ध होत आहे. प्रत्येक सेंटरच्या मेडिकलमध्ये ठराविक साठा दिला गेला आहे. त्यामुळे आवश्यक असलेल्या रुग्णांना त्यांच्याकडुनही इंजेक्शन उपलब्ध होणार आहे. अनेक ठिकाणी इंजेक्शन असुन ते दिले जात नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. वॉर रुममधून साठ्याची माहिती व दिलेल्या रुग्णांची यादी याचाही हिशोब ठेवण्यात येत आहे. साहजिकच यामुळे आता काळाबाजार होण्याची शक्यता कमी झाली आहे.