क्रांतिकारी निर्णयांमुळे विरोधकांना धडकी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CM Eknath Shinde

क्रांतिकारी निर्णयांमुळे विरोधकांना धडकी

पैठण : ‘मी सर्वसामान्य कार्यकर्ता असून सर्व सामान्य जनतेचा मुख्यमंत्री आहे. सरकार स्थापनेनंतर दोन महिन्यांत शेतकरी तसेच सामान्य नागरिकांसाठी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. त्यामुळे विरोधकांना धडकी भरली असून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे,’ असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना आज लगावला.

पैठण येथे आयोजित जाहीर सभा व नागरी सत्कार कार्यक्रमाप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बोलत होते. विरोधकांवर टीका करताना शिंदे म्हणाले की, ‘‘याकूब मेननसारख्या देशद्रोही लोकांचे हस्तक होण्यापेक्षा शहा-मोदींचा हस्तक होणे कधीही चांगले आहे. सरकारमधील घटक पक्षाकडून अन्याय व मुस्कटदाबी होत असल्यामुळे हे धाडस आम्ही केले असून महाविकास आघाडीला आम्ही ५० जण पुरून उरलो आहोत. गेल्या अडीच वर्षांच्या काळातील सण उत्सव होत नसल्यामुळे राज्यातील जनतेचा श्वास कोंडला होता. तो श्वास मोकळा करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आम्ही घेतला.

त्यामुळे हे सरकार लोकांच्या मनातले सरकार असून मी जेथे जातो तेथे लोकांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळते. साधा कार्यकर्ता असताना जनतेत होतो. आताही मुख्यमंत्री असलो तरी जनतेतच आहे. जनतेसाठी चांगली कामे करीत राहायची हेच आता ठरविण्यात आले असून बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना व विचार पुढे नेण्यासाठी सदैव तत्पर आहे.’’

पैठणच्या विकासासाठी निधी देणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पैठण मतदार संघातील विविध विकास कामे करण्यासाठी हे सरकार शासनस्तरावर निधी देणार असल्याचे सांगितले. त्यात पैठण येथे १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय, पैठणी क्लस्टर, संत ज्ञानेश्वर उद्यान व शहर पाणी पुरवठा या योजनांचा उल्लेख मुख्यमंत्री यांनी केला.

अन् रस्त्यावर गोमूत्र शिंपले

एकनाथ शिंदे हे पैठण दौऱ्यावर असताना बिडकीन येथे निलंजगाव फाटा ते बिडकीन बस स्टँडपर्यंत रॅली काढण्यात आली होती. मुख्यमंत्री हे पैठणकडे रवाना झाल्यानंतर चार वाजल्याच्या सुमारास दरम्यान शिवसेनेचे तालुकाध्यक्ष मनोज पेरे, माजी सरपंच अशोक धर्मे यांच्यासह उद्धव गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी निलज गावफाटा ते बिडकीन बस स्टॅन्डपर्यंत गोमूत्र शिंपले. तसेच यावेळी त्यांनी शिवसेना सोडून गेलेल्यांविरुद्ध घोषणा दिल्या.

Web Title: Paithan Meeting Cm Eknath Shinde Criticism On Opposition Leaders

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..