Chhatrapati Sambhajinagar : पालिकेचा कर भरा पण पाण्यासाठी मरमर करा!

सिडको-हडकोच्या पाण्यावर कोण मारतेय डल्ला? रोज २० एमएलडीची तूट, त्यात टॅंकरचाही भार
pay water bill to municipal corporation but water crisis as hell as
pay water bill to municipal corporation but water crisis as hell as Sakal

छत्रपती संभाजीनगर : महापालिका पाणीपट्टीसह मालमत्ता कर नियमित वसूल करते. पण, केवळ उन्हाळाच नाही तर वर्षभर शहरातील पाणीप्रश्‍न गंभीर बनलेला आहे. विशेषतः सिडको-हडको भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या भागाला ३८ एमएलडी पाणी देण्यासाठी एक्स्प्रेस वाहिनी टाकण्यात आली.

पण, त्यातून सध्या १५ ते १८ एमएलडी पाणी मिळत आहे. त्यामुळे २० एमएलडी पाण्यावर डल्ला कोण मारते? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे सिडको-हडको भागासाठी पाण्याचे शॉर्टेज असताना त्यात टॅंकरचा भार टाकला जात असून, त्यासाठी रोज तीन एमएलडी पाणी दिले जाते. दरम्यान, ‘कर भरा; पण पाण्यासाठी मरमर करा!’ हेच नागरिकांच्या नशिबात आहे.

शहराला दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागतात. दरवर्षीचा हा अनुभव पाहता, यंदा उन्हाळ्यापूर्वी नव्या ९०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीचे काम पूर्ण करून पाणी उपसा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार २० एमएलडी पाणी वाढल्याचा दावा केला जात असला, तरी शहरात पाणीटंचाई कायम आहे.

पाणीपुरवठा विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिडको-हडको भागाला ३८ एमएलडी पाणीपुरवठा करण्यासाठी नक्षत्रवाडीहून एक्स्प्रेस जलवाहिनी टाकण्यात आली. मात्र, ३८ एमएलडीच्या तुलनेत सिडको-हडको भागाला फक्त १५ ते १८ एमएलडी पाणीपुरवठा केला जातो.

त्यातच अडीच ते तीन एमएलडी पाणी टँकर्सच्या माध्यमातून वितरित केले जात असल्यामुळे कमी पाणी मिळत आहे, त्याचा परिणाम उन्हाळ्यात जास्त जाणवतो. त्यामुळे सिडको-हडकोवासीयांना पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहेत.

तब्बल ९८ टॅंकरद्वारे पुरवठा

विविध वसाहतींना ९८ टँकर्सच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. टँकर्सच्या ४३० खेपा होतात. ७० टँकर्स एन-५, एन-७ येथील जलकुंभांवरून भरले जातात. या टॅंकरच्या ३४० खेपा होतात. एन-५ जलकुंभावरून रोज ४८ टँकर्सच्या २४० खेपा, तर एन-५ येथील जलकुंभावरून शंभर खेपा होतात.

ब्लॅकमध्ये विक्री

महापालिकेकडून पाच हजार लिटरच्या टँकरसाठी ८७९ रुपये घेतले जातात. पण, कंत्राटदार व महापालिकेचे कर्मचारी प्रत्येकाची गरज पाहून टँकरचे शुल्क घेतात. एका टँकरसाठी एक हजार ते बाराशे रुपये घेतात.

टॅंकरसाठी वेटिंग, महापालिकेत मारतात खेट्या

मागेल त्याला टॅंकर देण्यात येत असल्याचा दावा महापालिकेतर्फे केला जात असला, तरी नागरिकांना टॅंकर सुरू करण्यासाठी महापालिकेत खेट्या माराव्या लागतात. पाच हजार लिटरचे टँकर १८ कुटुंबांना दिले जाते, अशा कुटुंबांना एकत्र करावे लागते.

आधी महापालिकेच्या प्रभाग कार्यालयात जावे लागते. तेथे नावनोंदणी व कोणत्या कार्यक्रमासाठी पाण्याचे टँकर पाहिजे, याची नोंद करून पैसे भरावे लागेल. नोंदणीनंतर प्रभाग कार्यालयातून पावती दिली जाते.

ही पावती घेऊन ज्या भागात तुम्हास टँकर न्यावयाचे आहे, तेथील टँकर पाणीपुरवठ्याच्या पॉइंटवर जाऊन पावती द्यावी लागते. टॅंकरच्या पाण्यासाठी नागरिकांचे निवेदन प्राप्त झाल्यानंतर त्या भागात एक दिवसाआड याप्रमाणे पाण्याचे टँकर उपलब्ध करून दिले जाते, असे कार्यकारी अभियंता के.एम. फालक यांनी सांगितले.

वर्षभरात केवळ ५० दिवस पुरवठा

महापालिकेतर्फे तीन दिवसांआड म्हणजेच चौथ्या दिवसी नळाला पाणी दिले जाते, असा दावा केला जातो. पण प्रत्यक्षात काही भागांत पाच ते सहा दिवसांआड तर काही भागांत आठ ते दहा दिवसाला पाणी मिळते. त्याचा विचार केल्यास नागरिकांना वर्षभरात ५० ते ५५ दिवस पाणी मिळते, पाणीपट्टी मात्र वर्षभराची घेतली जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com