esakal | ‘जनता कर्फ्यू’मध्ये जोपासले छंद, आंघोळ अन् जेवणाच्या चुकल्या वेळा

बोलून बातमी शोधा

Aurangabad News

सगळ्यांनी एक महत्वाची बाब जोपासली ती म्हणजे, आपले छंद. यात कुणी पुस्तके वाचली तर, कोणी थेट किचनचा ताबा घेतला. आपल्या आणि कुटुंबियांचे आवडीचे पदार्थ बनवत होते. या पदार्थांचे फोटो टाकत त्यांचे ‘चव’दार किस्से शेअर केले जात होते.

‘जनता कर्फ्यू’मध्ये जोपासले छंद, आंघोळ अन् जेवणाच्या चुकल्या वेळा
sakal_logo
By
अतुल पाटील

औरंगाबाद : ‘जनता कर्फ्यू’मुळे रविवारी (ता. २२) अख्खं कुटुंब बंदिस्त झालं. मौका साधत काही पुरुषांनी थेट किचनचाच ताबा घेतला. चटक-मटक रेसिपी घरातील महिला मंडळासमोर ठेवल्या. रेसिपीचा आस्वाद घेत घरगुती खेळ खेळले गेले. हे सगळं पाहायला मिळालं, ते सोशल मीडियावर. फेसबुकवर फोटो आणि अनुभवांचा अक्षरश: रतीब सुरु होता दिवसभर. यात भर पडली ती चुटकुल्यांची. आणि हो.. काहींनी घरात गायलेली कोरोना स्पेशल गाणीदेखील या प्लॅटफॉर्मवर पेश केली.

‘जनता कर्फ्यू’ला सकाळी सात वाजताच सुरुवात झाली. झोपेतून उठताच, या कर्फ्यूला नेमका प्रतिसाद कसा मिळाला, हे पाहण्यासाठी अनेकांनी सोशल मीडिया निवडली. आजूबाजूची गजबजलेली ठिकाणे ओस दिसू लागल्याने विनोदबुद्धी झाल्याचे पहायला मिळाले. सोशल मीडियात उपलब्ध होणाऱ्या फोटोंना पुन्हा काहीतरी हटके कॅप्शन जोडत व्हायरल करत होते. बहुदा पहिल्यांदाच असा बंद असल्याने लोकांनी हा वेळ कुटुंबीयांसोबत व्यतीत केला. दरम्यान, आम्ही नेमकं घरात काय करतोय? हे सांगायलाही ते विसरत नव्हते.

सगळ्यांनी एक महत्वाची बाब जोपासली ती म्हणजे, आपले छंद. यात कुणी पुस्तके वाचली तर, कोणी थेट किचनचा ताबा घेतला. आपल्या आणि कुटुंबियांचे आवडीचे पदार्थ बनवत होते. या पदार्थांचे फोटो टाकत त्यांचे ‘चव’दार किस्से फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, हॅलो, टिकटॉक, शेअर चॅट आदी सोशल मीडियावर शेअर केले जात होते. हे करत असतानाच त्यांनी घरगुती खेळांनाही प्राधान्य दिले. कॅरम खेळणे, गाण्यांच्या भेंड्या खेळल्या जात होत्या तर, टाकाऊ पदार्थांपासून कोलाज करत लहानग्यांनीही पालकांसमोर पेश केले. याचे प्रतिक्रियेतून कौतुक, आश्‍चर्य, आनंद व्यक्त होत असताना खेचायची संधीही सोडली नाही.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

गंमत अशी कि, सोशल मीडियावरून अनेकांचे लक्षच हटत नव्हते, यात आंघोळ, जेवणाच्या वेळा चुकल्याचे किस्से सांगतानाही त्यांची विनोदबुद्धी लोकांच्या प्रतिक्रिया खेचून घेत होती. घराच्या गॅलरीतून ओस पडलेल्या रस्त्यावरचे फोटो व्हिडिओ टिपले तर एरवी वाहनांच्या गोंगाटात गायब झालेला पक्षांचा किलबिलाट पुन्हा ऐकायला मिळाला तो आनंद अनेक जण सोशल मीडियावर व्यक्त करत होते.

कोरोनाची गाणीही व्हायरल
ज्यांचा आवाज चांगला आहे, साथसंगत करायला बाजूला मुलं बसली आहेत, असे असल्यावर अनेकांनी जुन्या गाण्यांच्या चालीवर कोरोना वर तयार केलेली गाणी म्हटली. ही गाणी नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाली. यात मोठे सरकारी अधिकारीही मागे नव्हते.