गोपनीय माहिती उघड केल्याप्रकरणी दोन पोलिस अंमलदार निलंबित

गोपनीय माहिती उघड केल्याप्रकरणी दोन पोलिस अंमलदार निलंबित
Published on: 
दोन पोलिस अंमलदार निलंबित -वरिष्ठांची परवानगी न घेता फाइल पुढे पाठवली; अधीक्षकांची कारवाई सकाळ वृत्तसेवा परभणी, ता. १ ः कर्तव्यातील हलगर्जीपणा, बेजबाबदार वर्तन, पोलिस खात्याची गोपनीय माहिती उघड केल्याच्या आरोपावरून पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांनी दोन पोलिस अंमलदारांविरुद्ध निलंबनाची कारवाई केली आहे. जिल्हा विशेष शाखेतील अमजदखान महेमूदखान, जिंतूर पोलिस ठाण्यातील महादेव शिवाजी गव्हाणे अशी निलंबित कर्मचाऱ्यांची नावे आहेत. जिंतूर येथील एका पेट्रोल पंपाच्या ना-हरकत प्रमाणपत्रासंदर्भात पोलिस प्रशासनाकडून अंतर्गत कार्यवाही सुरू होती. या प्रक्रियेदरम्यान अमजदखान यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी न घेता, निर्धारित प्रशासकीय नियमांचे पालन न करता संबंधित फाइल पुढील कार्यवाहीसाठी पाठविल्याचा आरोप आहे. जिंतूर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या महादेव गव्हाणे यांनी अधिकृत जबाबदारी नसतानाही गोपनीय शाखा, पोलिस अधीक्षक कार्यालयातील कामकाजात हस्तक्षेप केल्याचे समोर आले. दोघांनी संगनमताने पोलिस निरीक्षकांची स्वाक्षरी असलेली फाइल परस्पर ताब्यात घेतली. एवढेच नव्हे, तर पोलिस विभागाशी संबंधित गोपनीय माहिती अर्जदाराच्या नगरसेवक असलेल्या भावाकडे सुपूर्द केल्याचाही आरोप आहे. या प्रकारामुळे पोलिस विभागातील गोपनीय कामकाज आणि प्रशासकीय शिस्तीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले. या प्रकरणाची दखल घेत पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांनी संबंधित दोन्ही अंमलदारांना निलंबित करण्याचे आदेश दिले. --- तीन दिवसांत अन्य तिघांवर कारवाई मागील तीन दिवसांत आणखी तीन पोलिस कर्मचाऱ्यांवर विभागीय कारवाई करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. संतोष चव्हाण, मनोज नागिमे आणि अनिल आसेवार अशी या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. गैरहजेरी, गुन्हे दाखल असणे, अन्य प्रशासकीय कारणांवरून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.