esakal | पोलिसांच्या बदल्यांचा फुटला पोळा, मर्जीतल्यांची मात्र चांदी
sakal

बोलून बातमी शोधा

police-15.jpg

पोलिसांच्या बदल्यांचा फुटला पोळा, मर्जीतल्यांची मात्र चांदी

sakal_logo
By
सुषेन जाधव

औरंगाबाद : पोलिस आयुक्तालयातील (Aurangabad Police Commissionerate) कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा बुधवारी (ता.२८) दुपारी पोळा फुटला. यामध्ये ३८१ कर्मचाऱ्यांची इतर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली. कोरोना (Corona) काळात रखडलेल्या बदल्या सुमारे दोन वर्षानंतर करण्यात आल्या. या बदल्यांमुळे काही कर्मचाऱ्यांमध्ये कही ‘खुशी’, कही ‘गम’ असे वातावरण आहे. दरम्यान, अधिकाऱ्यांच्या मर्जीनुसार ठाण्यात संलग्न केलेल्या कर्मचाऱ्यांची मात्र जाहीर झालेल्या यादीत नावे नाहीत. त्यामुळे शहर पोलीस (Aurangabad) दलात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. काही कर्मचाऱ्यांना अडीअडचणीनुसार पोलीस मुख्यालयातून संलग्न केले गेले आहे. पण हे कर्मचारी गेल्या अनेक महिन्यांपासून त्याच ठिकाणी ठाण मांडून आहेत. त्यामुळे त्यांच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांची ‘कृपादृष्टी’ कायम असल्याचे बदल्यांवरुन दिसून येत आहे. शहर पोलीस दलात विविध पोलीस ठाण्यांसह शाखेत आणि मुख्यालयातील कर्मचाऱ्यांची मुदत संपली होती.(Police Personnels transfered in aurangabad commissionerate glp88)

हेही वाचा: खड्ड्यात बेशरमाचे झाड लावून‘आप’चे आंदोलन

मात्र, मध्यंतरी कोरोना महामारीमुळे त्यांच्या बदल्या रखडल्या होत्या. दरम्यान, बुधवारी बदल्यांना अखेर मुहूर्त लागला. ३८१ कर्मचाऱ्यांमध्ये ४३ सहायक फौजदार, १०३ जमादार, ८३ पोलीस नाईक आणि १५२ पोलीस शिपायांचा समावेश आहे. पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी या बदल्यांसंबंधीचे आदेश काढले आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याशी याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, संलग्न कर्मचाऱ्यांना तीन ते चार महिन्यांपर्यंत संलग्न राहण्याची परवानगी दिली जाते. याशिवाय असे किती कर्मचारी आहेत याबद्दल सांगू शकत नाही. पण हा खातेअंतर्गत विषय असल्याचे सांगत त्यांनी अधिक बोलणे टाळले. शहरातील १७ पोलीस ठाण्यात कार्यरत अनेक कर्मचारी हे गेल्या कित्येक वर्षांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडून आहेत. अधिकाऱ्यांच्या मर्जीमुळे त्यांच्या बदल्या होत नसल्याची चर्चा शहर पोलीस दलात दिवसभर सुरु होती. मलाईदार ठाण्यातही विशेष मर्जीतील कर्मचारी अद्यापही त्याच ठिकाणी डेरेदाखल आहेत. तसेच यातील कर्मचाऱ्यांवर हप्ता वसूलीचे आरोपही झाले आहेत.

हेही वाचा: सुखद! नांदेडमध्ये केवळ दोघे जणच कोरोना पाॅझिटिव्ह

त्या कामातील तज्ज्ञांची निकड

तत्कालीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बदल्यांसंदर्भात महत्त्वपूर्ण सूचना अधिका-यांना केली होती. ते म्हणाले होते की, एखादा कर्मचारी ठराविक कामात तज्ज्ञ असेल तर त्याला संलग्न किंवा त्याच कामासाठी त्याची नियुक्ती व्हावी. त्यामुळे पोलीस दलाला त्याच्या कामाच्या अनुभवाचा फायदा होईल. दरम्यान, सध्याची परिस्थिती पाहता बोटावर मोजण्याइतके तज्ज्ञ कर्मचारी उल्लेखनीय कामगिरी करताना दिसून येतात. त्यामुळे संलग्न ठेवलेल्या काही कर्मचा-यांकडून अशी कामगिरी होताना दिसून येत नाही, अशी चर्चाही आहे.

loading image
go to top