रब्बीची अनिश्चितता, आता मनरेगावर भिस्त
----
काढणीची कामे घटली; बांधकामासह अन्य कामांचा शोध
---
धाराशिव, ता. २२ (बातमीदार) : जिल्ह्यात यंदा दुष्काळामुळे शेतीकामे जवळपास ठप्प झाली आहेत. खरीप हातातून गेल्याचा फटका शेतमजुरांनाही बसला आहे. सध्या शेतामध्ये कामेच उपलब्ध नसल्यामुळे शेतीवर अवलंबून असलेल्या शेतमजुरांच्या उदरनिर्वाहाचा व रोजगाराचा प्रश्न निर्माण होत आहे.
दरवर्षी खरिपातील पिकांच्या काढणीच्या हंगामात शेतमजुरांना सलग दोन महिने हाताला काम मिळायचे. त्यातून मिळालेल्या मजुरीवर त्यांच्या कुटुंबाचा काही महिन्यांचा उदरनिर्वाह चालायचा. मात्र, यंदा सोयाबीनचे पीक वाया गेले असून, उत्पादनात मोठी घट झाली. पिकातून येणारा उत्पन्न खर्चही निघत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांना सोबत घेऊनच काढणीची कामे उरकली. काही शेतकऱ्यांनी मजुरीचा खर्च परवडत नसल्याने हार्वेस्टरचा वापर करून सोयाबीनची काढले. परिणामी, यंदा शेतमजुरांना दरवर्षीच्या तुलनेत काढणीची कामे कमी मिळाली. ज्या ठिकाणी कामे मिळाली, तिथेही मजुरांना अपेक्षित मजुरी मिळाली नाही. सहा ते दहा मजूर एकत्रित येऊन सोयाबीन काढणीची कामे घेत असत. सामान्यतः खरिपाची काढणी आटोपल्यानंतर शेतकरी रब्बीच्या पेरणीच्या तयारीला लागतात, ज्यातून मजुरांना काही प्रमाणात काम उपलब्ध व्हायचे. परंतु, यंदा खरीप संपत आला, तरी जमिनीत पुरेसा ओलावाच नसल्याने रब्बीची पेरणी होणार की नाही, याबद्दल मोठी अनिश्चितता आहे. त्यामुळे आगामी काळातही शेतीत काम मिळण्याची शक्यता मावळली आहे.
------
रोहयोच्या कामांवर भिस्त
शेतातील बहुतांश कामे ठप्प झाल्यामुळे अनेक शेतमजुरांनी बांधकामासह अन्य मजुरीची कामे शोधण्यास सुरवात केली आहे. दुसरीकडे, ग्रामीण भागातील मजुरांची संपूर्ण भिस्त आता रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) कामांवरच अवलंबून आहे. मजुरांच्या हाताला काम देण्यासाठी प्रशासनाकडूनही हमी योजनेअंतर्गत सार्वजनिक तसेच वैयक्तिक स्वरूपाची कामे प्राधान्याने उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू करण्यात आले आहे. यामध्ये ग्रामपंचायत स्तरावर विहीर, गोठा, रस्ते, जलतारा, घरकुल, यंत्रणामार्फत फळगाव, रेशीम, रोपवाटिका, जलसंधारण आदी कामांचा समावेश आहे. जिल्ह्यातील शेतमजुरांना आगामी काळात काही दिवस या कामांचा आधार मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतमजुरांची भिस्त आता हमी योजनेच्या कामावरच असल्याची स्थिती सध्या आहे.