esakal | आभाळ फाटलं : चाळीसगाव पाण्यात; कन्नड घाट दरडीखाली
sakal

बोलून बातमी शोधा

आभाळ फाटलं : चाळीसगाव पाण्यात; कन्नड घाट दरडीखाली

आभाळ फाटलं : चाळीसगाव पाण्यात; कन्नड घाट दरडीखाली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद/जळगाव/नगर : गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने सोमवारी मध्यरात्री मराठवाडा-खान्देश सीमेवर जोरदार हजेरी लावली. चाळीसगाव परिसरात ढगफुटीसृदृश्‍य पाऊस झाल्याने धुळे-सोलापूर महामार्गावरच्या कन्नड घाटात तीन ठिकाणी दरड कोसळली. अहोरात्र वाहनांनी गजबलेला कन्नडचा घाटरस्ता चिखलाने अक्षरश: माखला. या दरडीमुळे घाटात असलेल्या गाड्यांचे नुकसानही झाले. यावेळी एक ट्रक दरीत कोसळला आणि त्याचा चालक बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, मराठवाडा आणि नगरच्या काही भागात पावसाने हजेरी लावली.

जळगावच्या चाळीसगाव तालुका आणि परिसरात सोमवारी रात्री ढगफुटीसदृश पाऊस झाला. जोरदार पावसाने तितुर, डोंगरी, वाडी या उपनद्यांसह गिरणा नदीलाही पूर आला. पुराचे पाणी गावांमध्ये शिरले असून, २० गावांचा संपर्क तुटला आहे. तर पुरात वाहून गेल्याने एका महिलेसह गुरांचाही बळी गेला आहे. नदीकाठच्या हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून, त्यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाचे जवानही चाळीसगावात दाखल झाले आहेत.

तीन ठिकाणी दरड कोसळली

कन्नड-चाळीसगाव घाटात पाऊस सुरू होण्याअगोदरच म्हणजे रात्री १० पासून कोंडी झाली होती. वाहने संथगतीने जात होते. त्यात रात्री ११ वाजेच्या दरम्यान मुसळधार पाऊस सुरू झाला. पावसाचे प्रमाण वाढत गेले तसतसे पहाटे २ वाजेच्या सुमारास घाटात तीन ठिकाणी दरड कोसळल्या तसेच माती, दगड, गोटे यांचा ढिगारा रस्त्यावर सर्वत्र पसरून रस्त्यावर चिखलच चिखल झाला. यावेळी अनेक वाहने येथील घाटाच्या कठड्याला अडकल्याने मोठा अनर्थ टळला. रात्री उशिरापर्यंत येथे जीवितहानी झाल्याची प्रशासनाकडे नोंद झाली नव्हती. या घटनेची माहितीक कळताच प्रशासन, पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी कन्नड घाटात धाव घेऊन येथील परिस्थितीची आढावा घेतला. घाटात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या आणि महामार्ग पोलिसांनी सकाळी मदत कार्य सुरू केले. जेसीबीच्या साहाय्याने चिखल व ढिगारे बाजूला करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.

हेही वाचा: गूगलने जुलैमध्ये ९५ हजार ‘पोस्ट’ वगळल्या

कन्नड घाटात वाहतूक ठप्प

वाहतूक ठप्प झाल्याने औरंगाबादकडून येणारी वाहतूक जळगावमार्गे, तर जाणारी वाहतूक नांदगावमार्गे वळविण्यात आली. घाटात अडकलेले काही वाहने आज सकाळी काढण्यात आली. मात्र, या मार्गावरील वाहतूक बंद राहणार असून घाटात १० ते १२ ठिकाणी रस्ता खचला असून काही ठिकाणी कठडे पडले आहेत. एक ट्रक पूर्णपणे ढिगाऱ्याखाली अडकला असून बुधवारी हा ट्रक काढण्यात येईल, असे महामार्ग प्राधिकरणाचे सहाय्यक अभियंता आशिष देवतकर यांनी सांगितले. घाटात थांबलेल्या एका ट्रकवर दगड कोसळल्यामुळे ट्रकचा चालक व त्यात असलेल्या ९ म्हशी ठार झाल्याचे वृत्त आहे. मात्र, याबाबत कुणीही अधिकृत दुजोरा दिला नाही.

मराठवाड्यात बरसला!

मराठवाड्यात काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने जन्माष्टमी आणि गोपाळकाल्याच्या मुहूर्तावर जोरदार हजेरी लावली. सोमवारी मध्यरात्री आणि मंगळवारी बहुतांश जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार पाऊस कोसळला. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड, सिल्लोड, बीडसह

जिल्ह्यातील गेवराई व वडवणी तालुक्यांना तर पावसाने झोडपून काढले. बीडमध्ये काही भागात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने शेतजमिनीसह पिके वाहून गेली. नांदेड जिल्ह्यातील पुरात तिघे जण वाहून गेले आहेत. औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक होता.

हेही वाचा: आधीचे सरकार असताना दर तीन दिवसांनी दंगल : योगी आदित्यनाथ

पावसाचा फटका

जळगाव जिल्हा

 • चाळीसगाव परिसरातील २० गावांचा संपर्क तुटला

 • गिरणेसह तितुर, डोंगरी, वाडी नदीला पूर; महिलेचा मृत्यू

 • चाळीसगाव तालुक्यातील असंख्य गावे अंधारात

 • नदीकाठच्या गावांमधील दोन हजारांवर नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले

 • पिके पाण्याखाली जाऊन कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.

 • घाटाच्या पर्यायी तलवाडा घाट रस्त्यावर वाहतूक कोंडी.

 • चाळीसगाव आणि ७ गावांमधील ७५०हून अधिक घरांमध्ये पाणी

 • ५५०हून अधिक गुरे वाहून गेली.

मराठवाडा

 • लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत पाऊस

 • कन्नड तालुक्यात दोन पाझर तलाव फुटून नागदमध्ये हाहाकार

 • औरंगाबाद शहरात मंगळवारी पावसाच्या सरी

 • बीड जिल्ह्यातील राजापूर गावाला पुराने वेढा दिला

 • अंबाजोगाई तालुक्यात एकजण वाहून गेला.

नगर जिल्हा

 • नगर जिल्ह्यात वडुले बुद्रूक येथील मंदिरच पाण्यात वाहून गेले.

 • पूजा करणाराही एक जण वाहून गेल्याची भीती

 • आखेगाव येथील अनेक शेतकऱ्यांच्या शेळ्या व जनावरे वाहून, तर पाण्यात बुडून मृत्यूमुखी

 • राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे पथक घटनास्थळी.

loading image
go to top