esakal | महापालिका हद्द वाळूजपर्यंत वाढविण्याची तयारी वेगाने
sakal

बोलून बातमी शोधा

aurangabad

महापालिका हद्द वाळूजपर्यंत वाढविण्याची तयारी वेगाने

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : सातारा-देवळाई परिसर पाच वर्षांपूर्वी महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेला आहे. या भागात अद्यापही नागरी सुविधा नाहीत. असे असतानाच महापालिकेची हद्द वाळूज-पंढरपूरपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव सिडको प्रशासनाकडून तयार करण्यात येत आहे. यानिमित्ताने आहे त्या भागातच सोयीसुविधांचा बोजवारा उडालेला असताना नवा भाग समाविष्ट केल्यास त्याचे काय, अशी चर्चाही सुरू आहे. (Aurangabad News)

महापालिकेची हद्दवाढ करण्यासाठीच्या हालचाली सुरू आहेत. वाळूज एमआयडीसीसह महापालिका करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे. आता त्याला मूर्त स्वरूप मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सातारा-देवळाई भाग पाच वर्षांपूर्वी महापालिकेत समाविष्ट केल्यानंतर आता पुन्हा महापालिकेची हद्दवाढ करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. वाळूज-पंढरपूर हा भाग महापालिकेच्या क्षेत्रात घेण्यात यावा यासाठी महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. त्यावेळी क्रेडाईच्या पदाधिकाऱ्यांनी वाळूज-पंढरपूरपर्यंत महापालिकेची हद्द वाढवण्याची मागणी केली होती. त्यानुसार महापालिकेच्या हद्दवाढीचा प्रस्ताव सिडको प्रशासनाकडून तयार केला जात आहे.

हेही वाचा: आभाळ फाटलं : चाळीसगाव पाण्यात; कन्नड घाट दरडीखाली

वाळूज परिसराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या परिसरात टोलेजंग इमारती, रो-हाउसेस उभे राहत आहेत. या परिसराला सुविधा मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे महापालिकेने हा परिसर हद्दीत घेण्याची तयारी सुरू केली आहे. या प्रस्तावात गोलवाडी, तिसगाव, पंढरपूर, वाळूज, वाळूज एमआयडीसी, वाळूज महानगर, बजाजनगर, वडगाव कोल्हाटी तसेच पिसादेवी, गोपाळपूर हा परिसर सामाविष्ट करण्‍याचा  विचार  सुरू आहे. सिडको झालर क्षेत्रात असलेल्या गावांचाही विचार होत आहे. हद्दवाढीचा प्रस्ताव लवकरच शासनाला सादर केला जाऊ शकतो, अशी शक्यता आहे.

आतापर्यंत दोनवेळा झाली हद्दवाढ

औरंगाबाद महापालिकेची स्थापना १९८२ मध्ये झाली. स्थापनेच्या वेळी महापालिकेच्या क्षेत्रात १८ गावांचा समावेश करण्यात आला. त्यानंतर २०१६ मध्ये पुन्हा महापालिकेची हद्दवाढ करण्यात आली आणि सातारा-देवळाई हा परिसर महापालिकेत समाविष्ट करण्यात आला. मात्र, अद्याप या भागात महापालिकेने नागरी सुविधा पुरविलेल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. महापालिका स्थापनेच्यावेळी समाविष्ट करण्यात आलेल्या १८ खेड्यांचा देखील अद्याप परिपूर्ण विकास होऊ शकला नाही. सध्या वाळूज एमआयडीसी भागात वाळूज, पंढरपूर, वळदगाव, वडगाव-बजाजनगर, जोगेश्‍वरी, रांजणगाव, घाणेगाव, तीसगाव या ग्रामपंचायतींचा चा समावेश आहे. या भागात सुमारे पाच लाख लोकसंख्या आहे.

loading image
go to top