esakal | Coronavirus| ​सौम्य लक्षणे असल्यास रेमडेसिव्हिरची गरज नाही

बोलून बातमी शोधा

Remdesivir
Coronavirus| सौम्य लक्षणे असल्यास रेमडेसिव्हिरची गरज नाही
sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद: रेमडेसिव्हिरचा वापर रुग्णांच्या वैद्यकीय स्थितीनुसार व आजाराचे मूल्यमापन करूनच देण्याची गरज आहे. ‘माइल्ड केसेस’मध्ये रेमडेसिव्हिर देण्याची गरज नाही. तर मॉडरेट केसेसमध्ये रुग्णांची को-मॉरबिडिटी बघूनच आणि रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण ९४ च्या खाली असल्यासच त्याला रेमडेसिव्हिरसाठी गृहीत धरायला हवे. महत्त्वाचे म्हणजे, रुग्ण गंभीर होऊन व्हेंटिलेटरवर गेला तर रेमडेसिव्हिरचा फार जास्त फरक पडत नाही, असा ‘एम्स’चा अभ्यास अहवाल असून याविषयीच्या मार्गदर्शक सूचना ‘एम्स’च्या माध्यमातून शासनाने रुग्णालयांना दिल्या आहेत.

रेमडेसिव्हिरचा कोणत्या परिस्थितीत वापर करायचा, रेमडेसिव्हिर उपलब्ध नसल्यास उपचार कसे करायचे याबाबत निकष आहेत. रुग्ण भरती झाल्याच्या चौथ्या दिवसापासून नवव्या दिवसांपर्यंत ऑक्सिजनसोबत रेमडेसिव्हिरचाही वापर होतो. रेमडेसिव्हिर ‘रिकमंडेड’ आहे; परंतु त्याचा मोठा साठा देशात सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे त्याचा वापर रुग्णांची गरज पाहून करावा अशा सूचना आहेत. रुग्णाची आरोग्याची स्थिती पाहून इंजेक्शन द्यायचे की नाही हे ठरवावे. नातेवाईक म्हणतात म्हणून रेमडेसिव्हिर देऊ नका, रुग्णांची गरज पाहून द्या, असे या सूचनांमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा: Ajanta Caves: जागतिक कलेचा आविष्कार अजिंठा लेणी टिकविण्याचे आव्हान

हा आहे ‘प्रोटोकॉल’

- रुग्ण गंभीर नाही, तोपर्यंत रेमडेसिव्हिरचा उपयोग फार चांगला ठरतो.

- रुग्ण गंभीर अवस्थेत गेला तर रेमडेसिव्हिरचा फार जास्त फरक पडत नाही.

- ज्यावेळी रुग्णाची ऑक्सिजनची गरज चालू आहे व ‘एनआयव्ही’लावले अशा स्थितीत रेमडेसिव्हिरचा उपयोग लाभकारी ठरतो.

- माइल्ड केसेसमध्ये रेमडेसिव्हिर देण्याची गरज नाही.

- मॉडरेट केसेसमध्ये रुग्णांची को-मॉरबिडिटी बघून व रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण ९४ च्या खाली असल्यास त्याला रेमडेसिव्हिरसाठी गृहीत धरा.

- हाय फ्लो नेजल ऑक्सिजन व ‘एनआयव्ही’वर असेल व त्यांचे रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण व्यवस्थित होत नाही अशांना रेमडेसिव्हिर देऊ शकता.

१० टक्के प्रकरणात दबाव

कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी नवीन सेंटर सुरू झाले. यात बहुतांश छोटे रुग्णालये आहेत. रुग्ण लवकर बरे करण्याचा दबाव छोट्या रुग्णालयावर असतो तो मोठ्या रुग्णालयावर येत नाही. दहा टक्के रुग्णांच्या बाबतीत दबावाचे प्रकार होतात. कारण रुग्ण जर घरातील कर्ता असेल तर त्या रुग्णाला तत्काळ बरे करण्यासाठी नातेवाइकांना मोठी चिंता असते. त्यामुळे ते डॉक्टरांकडे रुग्णाला रेमडेसिव्हिर द्यावे म्हणून आग्रह धरतात, असे डॉ. हिमांशू गुप्ता यांनी सांगितले.

हेही वाचा: स्कोअर १५, रुग्णालयाचा नकार, तरी भीमाबाईंनी केला कोरोनाचा प्रतिकार!

रेमडेसिव्हिर कधी द्यायचे व कधी द्यायची गरज नाही याबाबत आयसीएमआरआयची मार्गदर्शक तत्त्वे आहेत. सध्या रुग्ण संख्या झपाट्याने वाढली. त्यामुळे मागणी व पुरवठ्यात बिघाड झाला आहे. सप्टेंबरमधील रुग्ण व आताच्या रुग्णसंख्येत मोठी तफावत आहे, त्यामुळे मागणी खूपच आहे.

- डॉ. हिमांशू गुप्ता, अध्यक्ष मराठवाडा हॉस्पिटल असोसिएशन व प्रशासक धूत रुग्णालय.