esakal | स्कोअर १५, रुग्णालयाचा नकार, तरी भीमाबाईंनी केला कोरोनाचा प्रतिकार!

बोलून बातमी शोधा

corona
स्कोअर १५, रुग्णालयाचा नकार, तरी भीमाबाईंनी केला कोरोनाचा प्रतिकार!
sakal_logo
By
संदीप लांडगे

औरंगाबाद: ‘‘आजीला रुग्णालयात दाखल करण्यासाठी या रुग्णालयातून त्या रुग्णालयात दिवसरात्र फिरण्याची वेळ आली. पाथर्डीहून नगर, नगरहून थेट औरंगाबाद शासकीय, खासगी रुग्णालयांचे दार ठोठावले. सर्वांनी तपासणी केली; पण बेड, ऑक्सिजन नसल्याचे कारण सांगून !ऍडमिट करून घेण्यासाठी नकार दिला. आजी आता कोरोनातून बरी होणार नाही, असे वाटल्याने नातवाने हंबरडा फोडला. पण, आजाराने त्रस्त असतानादेखील आजीनेच त्याला आश्वस्त केले. काळजी करू नको, मला काहीच होणार नाही... आजीच्या या धीराने नातवाला हुरूप आला. आजीला मिनी घाटीत बेड मिळाला व तिची जगण्याची जिद्द पाहून डॉक्टरांनीही प्रयत्न सुरू ठेवले. त्यामुळे एचआरसीटी स्कोअर १५ येऊनही अखेर भीमाबाई कोरोनावर मात करून सुखरूप घरी परतल्या.

नगर जिल्ह्यातील शिराळ चिचोंडी (ता. पाथर्डी) येथील भीमाबाई तुपे (वय ८५) यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. डॉक्टर्सनी त्यांना एचआरसीटी करण्यास सांगितले. तेव्हा स्कोअर होता १५; तर ऑक्सिजन पातळी ८४-८५ च्या आसपास. भीमाबाईंचे वय जास्त, त्यात रक्तदाबाचा त्रास असल्यामुळे पाथर्डीतील बहुतांश रुग्णालयांनी त्यांना नगरला जाण्याचा सल्ला दिला. आजीला नगरला घेऊन गेल्यानंतर दोन दिवस नातू अक्षय नानासाहेब तुपे फिरले. एकाही रुग्णालयात ऑक्सिजनचा बेड शिल्लक नसल्याने हताश होऊन औरंगाबादला एका खासगी हॉस्पिटलमध्ये संपर्क केला.

हेही वाचा: Ajanta Caves: जागतिक कलेचा आविष्कार अजिंठा लेणी टिकविण्याचे आव्हान

खासगी हॉस्पिटलने बेड, ऑक्सिजन असल्याचे सांगितले. वेळ न घालवता नगरहून ते औरंगाबादला आले. मात्र, आजीला पाहताच त्या हॉस्पिटलने अॅडमिट करून घेण्यास नकार दिला. दोन दिवस आजी वाहनातच जगण्यासाठी संघर्ष करत होती. त्यामुळे नातवाने पुन्हा हॉस्पिटलसाठी शोधाशोध सुरू केली; पण नकारघंटाच येत असल्याने अक्षयला रडू कोसळले. आजी नातवाची धावपळ पाहत होती. तिने नातवाला आश्वस्त केले. घाबरू नको, मी धडधाकट आहे, मला काहीच होणार नाही. आजीच्या या शब्दाने नातवालाही हुरूप आला.

शेवटी नातवाने मिनी घाटीला संपर्क केला. मिनी घाटीने सुरुवातीला बेड शिल्लक झाले की लगेच संपर्क करू असे सांगितले. तोपर्यंत आजीची प्रकृती खालावत चालली होती. दुसऱ्याच दिवशी मिनी घाटीतून बेड शिल्लक असल्याचा फोन आला. नातवाने क्षणाचाही विलंब न करता आजीला चिकलठाणा येथील मिनी घाटीला आणले.

हेही वाचा: Breaking News| औरंगाबाद महापालिकेच्या स्टोअरमधून 48 Remdesivir इंजेक्शन चोरी

सर्व डॉक्टर्स, नर्स यांनी आजीची नातवासारखीच सेवा केली. आजीच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली. ऑक्सिजन लेव्हल ९९ ते शंभरवर आली. त्यानंतर काही दिवसांत आजीला सुटी मिळाली. आजीच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. आजी भरल्या नयनांनी सर्वच कर्मचाऱ्यांचे हातात हात घेऊन धन्यवाद व्यक्त करत होती.

हेही वाचा: चांगली बातमी! औरंगाबादची रुग्णसंख्या महिनाभरात निम्म्याने घटली

नगरच्या खासगी रुग्णालयातील स्थिती -

नगरमध्ये कोरोनाची परिस्थिती बिकट आहे. ज्या रुग्णालयात संपर्क करत होतो, तेथे एका बेडसाठी शंभर रुग्ण वेटिंगवर होते. तर एका नामांकित रुग्णालयात पाच बेडसाठी पाचशे रुग्ण वेटिंगवर असल्याचे सांगण्यात आले. तरी देखील नंबर लागेल का याबाबत शाश्‍वती नव्हती. त्यामुळे औरंगाबादला उपचारासाठी आणले, असे अक्षय तुपे यांनी सांगितले