
Aurangabad : रिक्षात डीजे कशाला पाहिजे,वाहतूक पोलिसांचा काणाडोळा ; आवाजाने प्रवासी हैराण
औरंगाबाद - शहरात रिक्षाचालकांचा बेशिस्तपणा वाढतच आहे. गेल्या काही दिवसांत तर जालना रस्त्यावरून धावणाऱ्या रिक्षांमध्ये सर्रासपणे कर्णकर्कश आवाजात डीजे सॉंग वाजविण्यात येत आहेत. रिक्षाचालकांच्या अशा वर्तनामुळे महिला तसेच ज्येष्ठ प्रवाशांची कुचंबणा होत आहे.
याकडे वाहतूक पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन रिक्षात विचित्र प्रकारे गाणे वाजविणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.शहरातील जालना रस्त्यावर धावणाऱ्या रिक्षाचालकांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या आवाजात डीजे सॉंग वाजवले जात आहेत.
कर्कश आवाजात गाणी वाजविण्यात येत असल्याने प्रवासी त्रस्त होत आहेत. रिक्षात बसताना वाद्य बंद असते मात्र, रिक्षा पुढे निघताच मोठ्या आवाजात गाणे सुरू होते.
विशेषतः जालना रस्त्यावरून धावणाऱ्या रिक्षांमध्ये हा प्रकार अधिक आहे. कर्णकर्कश आवाजातील गाण्यांमुळे प्रवास करणाऱ्या महिला, मुली, ज्येष्ठ नागरिकांची कुचंबणा होत आहे. विशेष जालना रस्त्यावर चौकाचौकात वाहतूक पोलिस उभे असताना, त्यांच्या समोरून मोठ्या आवाजात गाणे वाजवणारे रिक्षा धावताना दिसत आहेत. विशेष म्हणजे रिक्षात गाणे वाजवणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे.
दंडात्मक कारवाई
प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनात मोठ्या आवाजात संगीत वाजवल्यास पहिल्या वेळेस पाचशे रुपये आणि दुसऱ्या वेळेस तोच गुन्हा केल्यास दीड हजार रुपये दंडाची तरतूद आहे. मात्र, मोठ्या आवाजात संगीत वाजवले म्हणून कारवाई करण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळेच रिक्षांमध्ये संगीत विशेषतः डीजे सॉंग वाजविण्याचे प्रमाण वाढले आहे.
कारवाईची गरज
रिक्षामध्ये संगीत वाजवले जाणार नाही, यासाठी पोलिसांनी सातत्याने कारवाई करण्याची गरज आहे. कारवाई करताना रिक्षातील टेपरेकॉर्डर किंवा इतर वाद्य काढून घेतले पाहिजे. असे केले तरच काही प्रमाणात रिक्षाचालकांच्या या प्रवृत्तीला आळा बसणार आहे, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.