Sambhaji Nagar : वाहनचोरी आणि दरोड्याचे तब्बल ३३ गुन्हे दाखल ; पिता-पुत्राची आंतरराज्य टोळी गुन्हे शाखेच्या पथकाने केली जेरबंद

तब्बल ३३ गुन्हे दाखल : अट्टल ‘जोडी’ पोलिसांच्या जाळ्यात
sambhaji nagar
sambhaji nagar sakal

छत्रपती संभाजीनगर : वाहनचोरी आणि दरोड्याचे तब्बल ३३ गुन्हे दाखल असलेली पिता-पुत्राची आंतरराज्य टोळी गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली. संशयित आरोपींनी १४ गुन्ह्यांची कबुली दिली असून त्यांना एका आलिशान कारसह पुंडलिकनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. वाहनचोरीत बाप नंबरी तर बेटा दसनंबरी निघाल्याचे पोलिसांच्या चौकशीत स्पष्ट झाले.

एन-४ भागातील दिनेश पाटील यांची महागडी कार डिसेंबरमध्ये चोरट्यांनी चोरुन नेली होती. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित हे १२ जानेवारीला एका महागड्या कारमध्ये नारेगाव भागात आल्याची टीप गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. यावरुन पथकाने सापळा रचून शेख दाऊद शेख मंजूर (वय ५८) आणि त्याचा मुलगा शेख अरबाज शेख दाऊद (वय १९ दोघे रा. धाड, घाटनांद्रा, बुलढाणा) यांना ताब्यात घेतले.

संशयित आरोपींची चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी इनोवा कार चोरल्याची कबुली दिली. संशयित आरोपी बाप-लेक हातचलाखीने कारची चोरी करायचे. बराच वेळ उभी असलेली कार हेरून ठेवायचे. त्याआधी रेकी केली जायची. एकजण चोरी करायचा तर दुसरा पाळत ठेवत होता. दरम्यान, आरोपींना ताब्यात घेतलेल्या कारसह पुंडलिकनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

ही कारवाई पोलिस निरीक्षक संदीप गुरमे, प्रवीण वाघ, संजय नंद, योगेश नवसारे, परभत म्हस्के, विजय भानुसे, संतोष भानुसे, संजीवनी शिंदे, ज्ञानेश्वर पवार यांनी केली.

१४ गुन्हे उघडकीस

पोलिसांनी या संशयितांची कसून चौकशी केली असता, त्यांनी धक्कादायक माहिती दिली. गेल्या एका वर्षात संशयित आरोपींनी शहरातून ६ इनोवा, २ क्रेटा, एक स्विफ्ट कार तसेच जळगाव, अहमदनगर आणि जालना जिल्ह्यातून महागडी वाहने चोरल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com