
Sambhaji nagar : स्मार्ट बसचे १०० कोटी रस्त्यांसाठी वापरणार
छत्रपती संभाजीनगर : स्मार्ट बससाठी ठेवण्यात आलेली एफडी मोडून १०० कोटी रुपयांचा निधी शहरातील रस्त्यांसाठी वापरण्याचा निर्णय स्मार्ट सिटीने घेतला होता. या निर्णयावर गुरुवारी (ता. २३) झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. मेंटॉर विनिता वेद-सिंघल यांनी शंभर कोटींचा निधी रस्त्यांसाठी खर्च करण्यास मान्यता दिली असल्याचे स्मार्ट सिटीचे सीईओ डॉ. अभिजित चौधरी यांनी सांगितले.
स्मार्ट सिटी संचालक मंडळाची वर्षभरानंतर गुरुवारी बैठक झाली. स्मार्ट सिटीच्या मेंटॉर तथा प्रधान सचिव विनिता वेद-सिंघल या ऑनलाइन पद्धतीने बैठकीत सहभागी झाल्या. तसेच स्मार्ट सिटीच्या कार्यालयातून संचालक भास्कर मुंढे, उल्हास गवळी, सिईओ डॉ. अभिजित चौधरी, अतिरिक्त सिईओ अरुण शिंदे बैठकीला उपस्थित होते.
जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय देखील ऑनलाइन पद्धतीने बैठकीस हजर होते. बैठकीत झालेल्या चर्चेसंदर्भात डॉ. चौधरी यांनी सांगितले की, स्मार्ट सिटीने शहर बस चालविण्यासाठी दोनशे कोटी रुपयांचा निधी फिक्स डिपॉझिट म्हणून ठेवला होता. २०२८-२०२९ या वर्षापर्यंत शहर बस चालविण्यासाठी हा निधी होता.
पण सध्या शहर बसच्या माध्यमातून दररोज मिळणारे उत्पन्न देखील फिक्स डिपॉझिट म्हणून ठेवले जात आहे. त्यामुळे २०२८-२९ पर्यंत शहरबसाठी आवश्यक निधी राखीव ठेऊन उर्वरित निधी रस्ते कामासाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याला बैठकीत मंजुरी मिळाली. तसेच वाळूज ते शेंद्रा एमआयडीसी दरम्यान
अखंड उड्डाणपूल व मेट्रोचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन कंपनीने महामेट्रो कार्पोरेशन महामंडळाला वर्कऑर्डर दिली आहे. मेट्रोचा डीपीआर तयार करण्यासाठी लागणार खर्च स्मार्ट सिटीतून करण्यास संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात
आली. मुख्य लेखाधिकाऱ्यांच्या नियुक्तीसह इतर कामांना देखील कार्योत्तर मंजुरी मिळली. संचालक मंडळामध्ये बदल झाला असून जिल्हाधिकारी श्री. पांडेय व महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांना संचालक म्हणून मान्यता देण्यात आली.
सिंघल शहरात येऊन घेणार आढावा
स्मार्ट सिटीमार्फत सध्या अनेक कामे सुरू आहेत. या कामांचा आढावा विनिता वेद-सिंघल या लवकरच छत्रपती संभाजीनगर येथे येऊन स्मार्ट सिटीच्या कामांचा आढावा घेणार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केल्याचे डॉ. चौधरी यांनी सांगितले.