Sambhaji nagar : अपर्णा थेटे यांची सलग दुसऱ्या दिवशीही ईडीमार्फत चौकशी Sambhaji Nagar Aparna Thete interrogated ED second day row | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ED

Sambhaji nagar : अपर्णा थेटे यांची सलग दुसऱ्या दिवशीही ईडीमार्फत चौकशी

छत्रपती संभाजीनगर : पंतप्रधान आवास योजनेच्या निविदा घोटाळ्याची ईडीमार्फत (सक्त वसुली संचालनालय) चौकशी सुरू आहे. महापालिकेच्या उपायुक्त अपर्णा थेटे यांना इडीने सोमवारी (ता. २०) मुंबई कार्यालयात पाचारण केले होते. सोमवारी दिवसभर चौकशी केल्यानंतर मंगळवारी (ता. २१) देखील त्यांची चौकशी करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

पंतप्रधान आवास योजनेच्या निविदा प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा प्रकार राज्य शासनाने नियुक्त केलेल्या चौकशी समितीने समोर आणला होता. त्यानंतर महापालिकेने मुळ कंत्राटदारासह १९ संचालकांच्या विरोधात निविदा भरताना रिंग केली.

एकाच आयपी ॲड्रेसवरून निविदा भरण्यात आल्याने महापालिकेची फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांत दिली. दरम्यान हे प्रकरण इडीकडे गेले. शुक्रवारी (ता. १७) छत्रपती संभाजीनगर शहरात येऊन विविध ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. सायंकाळी ईडीचे पथक महापालिकेत आले व चौकशीसाठी आवश्‍यक कागदपत्रे ताब्यात घेतले.

त्यानंतर उपायुक्त तथा पंतप्रधान आवास योजनेच्या विभागप्रमुख अपर्णा थेटे यांना चौकशीसाठी मुंबईला हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले. त्यानुसार अपर्णा थेटे या सोमवारी मुंबईतील इडी कार्यालयात हजर झाल्या. सोमवारी दिवसभर त्यांची चौकशी केल्यानंतर मंगळवारी पुन्हा त्यांची चौकशी करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.