
Sambhaji nagar : महापालिकेच्या उपायुक्त थेटे यांना EDचे समन्स
छत्रपती संभाजीनगर : पंतप्रधान आवास योजनेसाठी महापालिकेने राबविलेल्या निविदेच्या गैरव्यवहाराची ईडीने (सक्त वसुली संचनालय) चौकशी सुरू केली आहे. कंत्राटदार व संबंधित घरे, कार्यालयावर शुक्रवारी (ता.१७) छापे मारण्यात आले होते.
त्यानंतर सायंकाळी हे पथक महापालिकेत आले व दोन तास चौकशी केली. त्यानंतर महापालिकेच्या उपायुक्त अपर्णा थेटे यांना समन्स बजावण्यात आले. त्यांना सोमवारी (ता. २०) मुंबईतील ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेसाठी राबविलेली निविदा प्रक्रिया वादग्रस्त ठरली आहे. निविदा प्रक्रिया राबविताना आवश्यक ते निकष पाळले गेले नसल्याचे समोर आले. यासंदर्भात राज्य शासनाच्या गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने चौकशी केली.
दरम्यान महापालिकेने देखील कंत्राटदारांनी रिंग करून एकाच आयपी पत्त्यावरून निविदा भरल्याची तक्रार पोलिसात तक्रार दाखल केली आहे. हा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. एकीकडे पोलिसांचा तपास सुरू असताना मुंबई मंत्रालयातून चौकशीची कागदपत्रे ईडीला देण्यात आली.
त्याआधारावर ईडीने शहरात शुक्रवारी छापे टाकले. शहरात चार ठिकाणी छापे टाकल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी महापालिका मुख्यालयाकडे आपला मोर्चा वळवला. महापालिकेत त्यांनी निविदा प्रक्रियेची कागदपत्रे ताब्यात घेतली. पंतप्रधान आवास योजनेच्या विभागप्रमुख तथा उपायुक्त अपर्णा थेटे यांच्याशी त्यांनी चर्चा केली.
त्यानंतर त्यांना समन्स बजावून ईडीचे पथक मुंबईला रवाना झाले. सोमवारी त्यांना मुंबईत ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याला प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनीही दुजोरा दिला. समन्स बजावण्यात आल्याबद्दलची माहिती उपायुक्तांनी आपल्याला फोन करून दिली आहे. सोमवारी मुंबईत चौकशीसाठी बोलावले आहे, असेही उपायुक्तांनी सांगितले आहे, असे चौधरी म्हणाले.