
Sambhaji Nagar : व्यापारी संकुलांमध्ये घुसले पोटभाडेकरू! महापालिका घेणार शोध
छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या मालकीच्या व्यापारी संकुलातील शेकडो गाळ्यांमध्ये पोटभाडेकरूंनी घुसखोरी केली आहे. महापालिकेला कमी भाडे भरून गाळेमालक अव्वाच्या सव्वा कमाई करत आहेत. या प्रकाराला आळा घालण्यासाठी प्रशासनाने आता पोटभाडेकरूंचा शोध सुरू केला आहे. तसेच गाळेधारकांकडून वर्षाला नव्हे तर प्रत्येक महिन्याला भाडे वसूल करण्याचा निर्णय देखील प्रशासक जी. श्रीकांत यांनी घेतला आहे.
महापालिकेने शहराच्या विविध भागात २७ व्यापारी संकुल उभारले आहेत. यात ५२० गाळे असून, यातील गाळे ३० वर्षाच्या लिजवर देण्यात येतात. गाळे भाड्याने देताना रेडीरेकनर दर लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, मात्र महापालिकेच्या जुन्या ठरावानुसार अनेकांना गाळे भाड्याने देण्यात आले आहेत. त्यांच्या कराराचे नूतनीकरण झालेले नाही. त्यामुळे अनेक भाडेकरू जुन्या पद्धतीनेच महापालिकेला भाडे भरतात, दर दुसरीकडे हे गाळे भाड्याने देऊन वर कमाई केली जाते. हा प्रकार काही वर्षांपूर्वी तत्कालीन आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या लक्षात आला होता.
त्यांनी चौकशी करत पोडभाडेकरून असलेल्या गाळ्यांना सील ठोकण्याचा निर्णय घेतला. पण राजकीय हस्तक्षेपामुळे ही कारवाई अर्धवट राहिली. त्यानंतर आता जी. श्रीकांत यांनी या विषयाला हात घातला आहे. ज्याठिकाणी पोटभाडेकरूसंदर्भात तक्रारी आल्या, तिथे चौकशी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गाळेमालकांकडून वार्षिक भाडे न घेता दरमहा भाडे घेतले जाणार आहे. गाळेधारकांना दरमहा भाडे आकारून त्यांच्याकडून ऑनलाइन पद्धतीने भाडे वसूल करण्याची सुविधा दिल्यास महापालिकेच्या तिजोरीत दरमहा रक्कम जमा होईल. गाळेधारकांना महापालिकेला सहकार्य करावे, त्यांच्या अडीअडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे प्रशासक जी. श्रीकांत म्हणाले.
फेरीवाला धोरण राबवणार
शहरात हातगाड्यांची संख्या मोठी आहे. महापालिकाला हातावर पोट असणाऱ्यांच्या पोटावर लाथ मारणार नाही. मात्र त्यांना नियमाप्रमाणे वागावे लागेल. फेरीवाला धोरण राबवून आरक्षणानुसार सर्वांना न्याय दिला जाईल, असेही जी. श्रीकांत यांनी नमूद केले.