
Sambhaji nagar : TB हरेल, देश जिंकेल!
छत्रपती संभाजीनगर : संसर्गजन्य आजारामुळे अनेकांचे मृत्यू होतात. दहा संसर्गजन्य आजारांमध्ये क्षय रोगाचाही समावेश आहे. पण योग्य आहार, उपचार घेतल्यास क्षय रोग बरा होण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे ‘टीबी हरेल, देश जिंकेल अभियान राबविले जात असून, क्षय रोग्यांना सकस आहार मिळावा यासाठी निक्षय मित्रांची निवड केली जात आहे. आत्तापर्यंत २३० क्षय रोग्यांना निक्षय मित्र मिळाले आहेत.
क्षय रोगाचे निर्मूलन करण्यासाठी प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानाची सुरवात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी केली आहे. त्यानुसार निक्षय मित्र अभियान देशभर राबविले जात आहे. क्षय रोग्यांना सकस आहार मिळाल्यास रोग बरा होण्याचे प्रमाण वाढते. अनेक रोग्यांची सकस आहाराची ऐपत नसते.
अशा रोगींना निक्षय मित्रामार्फत सकस आहार दिला जात आहे. शहरातील १५०० क्षय रोगींनी सकस आहार मिळावा, यासाठी संमती दिली असल्याचे शहर क्षयरोग अधिकारी डॉ. मनिषा भोंडवे यांनी सांगितले.
आत्तापर्यंत २३० जणांची जबाबदारी निक्षय मित्रांनी घेतली आहे. निक्षय मित्रांना याबाबत प्रमाणपत्र दिले जाणार आहे. आणखी निक्षय मित्रांचा महापालिका शोध घेत आहे. दानशूरांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा व डॉ. भोंडवे यांनी केले.
महापालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रात बेडका तपासणी व मोफत एक्सरे, ओषधोपचार केले जातात. क्षय रोग्याच्या संपर्कातील व्यक्तींवर मोफत प्रतिबंधात्मक उपचार केले जातात. तसेच निक्षय पोषण योजनेअंतर्गत क्षय रुग्णाला उपचार पूर्ण होईपर्यंत ५०० रुपयांचे अनुदान दिले जाते,
असे डॉ. भोंडवे यांनी सांगितले. क्षयरोग हा आजार ''मायकोबॅक्टेरिया'' या प्रकारच्या जिवाणूंमुळे होत असतो. त्यातील मुख्यत्वे ''मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलॉसिस'' या प्रकारामुळे माणसाला क्षयरोग होतो. यात मुख्यतः ७५ टक्के रुग्णांमध्ये फुफ्फुसांना बाधा होत असते. काही रुग्णांमध्ये फुफ्फुसेतर अवयवांना ही बाधा होत असते.
एका महिन्यासाठी आहाराची गरज
गहू, बाजरी, तांदूळ- ३ किलो
दाळी-१.५ किलो
तेल-२५० ग्रॅम
दूध पावडर, शेंगदाणे- १ किलो.
अंडी-३०
क्षयरोग्याच्या एका महिन्याच्या आहारासाठी ६०० रुपये खर्च येतो.
अशी आहेत लक्षणे
दोन आठवड्यापेक्षा अधिक कालावधीचा खोकला
सायंकाळी येणारा हलकासा ताप
वजनात घट, थुंकीवाटे रक्त पडणे.
मानेवर गाठी, भूक मंदावते.
काय घ्यावी काळजी
लक्षणे आढळल्यास त्वरित बेडकी तपासा.
पूर्ण औषधोपचार घ्या, कुठेही थूंकू नका.
खोकलताना, शिंकताना तोंडावर रुमाल ठेवा.