Samruddhi Expressway
esakal
छत्रपती संभाजीनगर, : वेगवान आणि वेळेची बचत करणाऱ्या समृद्धी महामार्गावर अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, राज्यातील इतर महामार्गांच्या तुलनेत येथे सर्वाधिक अपघात नोंदवले गेले. यंदा जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान समृद्धीवर १४२ अपघातांत १२८ जणांचा बळी गेला. अतिवेग आणि ‘हायवे हिप्नोसिस’ यामुळे सर्वाधिक दुर्घटना घडल्याचे सेव्ह लाइफ फाउंडेशनच्या सर्वेक्षणातून समोर आले.
नागपूर ते मुंबई साडेसातशे किलोमीटरचे अंतर अवघ्या सात तासांत पार करता यावे, या उद्देशाने हा महामार्ग तयार करण्यात आला. मात्र, सरळसोट सिमेंटचा रस्ता आणि कोणताही अडथळा नसल्याने वाहनांचा अतिवेग अपघातांना कारणीभूत ठरत आहे. या महामार्गावरील वेरूळ परिसरात शनिवारी (ता. २६) चालकाला डुलकी लागल्याने भरधाव कार समोरच्या कंटेनरवर धडकली. या दुर्घटनेत आयटी अभियंता, त्यांची पत्नी आणि लहान मुलाचा जागीच मृत्यू झाला. अपर पोलिस महासंचालक (वाहतूक) कार्यालयाच्या माहितीनुसार, या महामार्गावर २०२३ मध्ये १३७ अपघातांत १२६ जण, तर २०२४ मध्ये २०२ अपघातांत १७३ जण मृत्युमुखी पडले होते. यंदा मात्र अवघ्या आठ महिन्यांतच मृतांचा आकडा १२८ वर पोचला आहे.