Sambhaji Nagar : ...तर थेट मीच तुमच्यावर गुन्हे दाखल करेन! ; पैठण रस्त्याची दुर्दशा पाहून जिल्हाधिकारी स्वामी संतापले

पैठण ते छत्रपती संभाजीनगर या रस्त्याचे अनेक ठिकाणी काम सुरू आहे. शिवाय पाणीयोजनाही या रस्त्याच्या बाजूने टाकली जात आहे. कुठे पाइप पडलेले, कुठे खड्डे खोदून ठेवलेले आहेत. त्यात दिशादर्शक सूचनाफलकही नसल्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या निदर्शनास आले.
Sambhaji Nagar
Sambhaji Nagarsakal

छत्रपती संभाजीनगर : पैठण ते छत्रपती संभाजीनगर या रस्त्याचे अनेक ठिकाणी काम सुरू आहे. शिवाय पाणीयोजनाही या रस्त्याच्या बाजूने टाकली जात आहे. कुठे पाइप पडलेले, कुठे खड्डे खोदून ठेवलेले आहेत. त्यात दिशादर्शक सूचनाफलकही नसल्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या निदर्शनास आले. यावर त्यांनी कार्यकारी अभियंत्यासह कंत्राटदाराला बुधवारी (ता. २०) चांगलेच झापले. दिशादर्शक फलकाची व्यवस्था केली नाही, तर थेट मी स्वतःच तुमच्याविरोधात गुन्हे दाखल करेन, असा इशाराच त्यांनी दिला.

जिल्हाधिकारी स्वामी बुधवारी (ता. २०) पैठणच्या संतपीठ येथे मतदार जागृती कार्यक्रमासाठी तसेच नाथषष्ठीच्या आढावा बैठकीसाठी जात असताना त्यांनी शहरातून निघाल्यापासून जागोजाग थांबून कामाचा आढावा घेत पाहणी केली. यात त्यांना अनेक समस्या आढळून आल्या. काही ठिकाणी पैठण रस्त्याचे काम सुरू आहे.

तसेच रस्त्याच्या बाजूने पाणी योजनेचे कामही होत आहे. यामुळे मूळ जुना रस्ता कुठून आहे, हेच कळत नाही. आधीच उशीर झालेल्या या कामाच्या ठिकाणी मोठमोठे पाइप रस्त्यावरच टाकलेले आहेत, तर काही ठिकाणी पाइप गाडल्यानंतर खड्डे अर्धवट बुजवले आहेत. यामुळे वाहनधारक थेट खड्ड्यात जाऊ शकतो. अशा वेळी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दिशादर्शक फलक लावणे; तसेच काम पूर्ण होईपर्यंत ठिकठिकाणी फलक घेऊन उभे राहणे आवश्यक आहे.

परंतु, अशी काहीच व्यवस्था नसल्याने वाहनधारक गोंधळून अपघात होऊ शकतात. असे प्रकार आढळून आल्याने जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी) आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) अधिकाऱ्यांची तसेच कंत्राटदाराची बुधवारी (ता. २०) खरडपट्टी काढली. दिशादर्शक फलकाची व्यवस्था केली नाही, तर थेट मी स्वतःच तुमच्याविरोधात गुन्हे दाखल करेन, असा इशारा त्यांनी दिला.

Sambhaji Nagar
Manoj Jarange : नेत्यांना गावबंदी करू नये ; मनोज जरांगे यांना खंडपीठाचे निर्देश

यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी अवघ्या अर्ध्या तासातच संतपीठ गाठले आणि रस्त्यासाठी आवश्यक ती काळजी घेतली जाईल, असे सांगितले. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांचा पारा आणखीनच चढला. आजवर झालेले अपघात बघता ही काळजी घ्यायलाच हवी, असे त्यांनी सुनावले.

अपघात झाला तर खबरदार...

आठ दिवसांवर नाथषष्ठी आली आहे. पालखी, दिंड्या, वारकऱ्यांची या रस्त्याने गर्दी होते. अशा वेळी वारकऱ्यांना अडचणी येऊ शकतात. विशेष म्हणजे, छत्रपती संभाजीनगर ते पैठण रस्त्यावर अनेक ठिकाणी वाहनधारकांना रस्त्याचा अंदाज येत नाही. अशातच दिंडी घेऊन जाणाऱ्या वारकऱ्यांचा अपघात होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास तुम्हालाच जबाबदार धरेन, असेही जिल्हाधिकारी स्वामी यांनी सुनावले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com