Crime News : झोपेत असलेल्या बेघराला नशेखोर गुंडांनी पेटवले!

पोलिस रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगारांनी झोपेत असलेल्या बेघर व्यक्तीला पेट्रोल टाकून पेटवत जाळून मारण्याचा केला प्रयत्न.
Aadil Shaikh and Krishna Shinde
Aadil Shaikh and Krishna Shindesakal

छत्रपती संभाजीनगर - पोलिस रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगारांनी झोपेत असलेल्या बेघर व्यक्तीला पेट्रोल टाकून पेटवत जाळून मारण्याचा प्रयत्न केला. शंभूनगर, चौसर भागातील त्रिशरण चौकात २ जुलैला रात्री साडेदहा वाजता हा खळबळजनक प्रकार घडला. ही घटना घडण्यापूर्वी दोन तासांअगोदर या गुंडांनी या व्यक्तीला दारू पाजली होती. याप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली असून, जवाहरनगर पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

त्रिशरण चौक येथे महीपालसिंग रणधीर सिंग गौर (वय ५७, रा. कायमचा पत्ता- ए ५, हनुमाननगर चौकरोड, तिरुपती पार्क, गुरुसहानीनगर, ह. मु. शंभूनगर) हे चार वर्षांपासून राहतात. गौर यांची पत्नी त्यांना सोडून गेली असून, ते मिळेल ते काम करून उदरनिर्वाह भागवितात आणि दुकानाच्या ओट्यावर झोपतात. याच भागात कुख्यात गुन्हेगार आदिल शाहरूख शेख हादेखील राहत असून, त्याची या परिसरात प्रचंड दहशत आहे.

दोन जुलैला रात्री साडेआठ वाजता गौर हे लाला पान सेंटरच्या मागे असलेल्या दुकानाच्या ओट्यावर बसलेले होते. यावेळी आदिल त्या ठिकाणी मद्यधुंद अवस्थेत आला. या ठिकाणी त्याने पुन्हा दारू प्राशन करीत गौर यांना देखील पाजली. यावेळी आदिल शिवीगाळ करीत असल्याने गौर यांनी त्याला तेथून जाण्यास सांगितले. यावेळी आदिल तेथून निघून गेला, मात्र त्याला गौर यांचा राग आला होता.

साडेदहाच्या सुमारास आदिल आणि त्याचा साथीदार कृष्णा शिंदे हे पुन्हा त्या चौकात आले. येताना त्यांनी एका बाटलीत तेथील गॅरेजमधून पेट्रोल आणले होते. गौर हे यावेळी दुकानाच्या ओट्यावर झोपलेले होते. त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकत या आरोपींनी पेटवून दिले.

आगीचा दाह लागल्याने गौर यांना जाग आली. त्यांनी बचावासाठी जोरजोरात आरडाओरड सुरू केली. यावेळी आदिल आणि कृष्णा पसार झाले. नागरिकांनी गौर यांच्या अंगावर पाणी आणि कपडे टाकत आग नियंत्रणात आणली. नागरिकांनी गौर यांना उपचारासाठी घाटीमध्ये दाखल केले. जवाहरनगर पोलिस ठाण्याला या घटनेची माहिती देण्यात आली.

जवाहरनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सूरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय मारोती खिल्लारे, गजेंद्र शिंगणे, संदीप क्षीरसागर आणि गुन्हे शाखेच्या पथकाने पसार झालेले आरोपी आदिल शाहरूख शेख (वय १९) आणि कृष्णा समाधान शिंदे (वय २० दोघे रा.शंभूनगर) यांना अटक केली. याप्रकरणी पीएसआय खिल्लारे तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com