Aurangabad : पायाभूत सुविधांना स्मार्ट सिटीचा ‘बूस्टर डोस’

एक हजार कोटींची कामे अंतिम टप्प्यात, वर्षभरात कायापालट
Aurangabad
Aurangabadsakal

औरंगाबाद : स्मार्ट सिटी अभियानात शहराची निवड होऊन पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. नागरिकांचे जीवनमान उंचावणे, पर्यटन, उद्योग-व्यापाराला चालना देण्यासाठी सुरू केलेल्या केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियानामुळे शहर आता कात टाकत आहे. महापालिकेच्या आर्थिक मर्यादेमुळे काही काळ थांबलेल्या पायाभूत सुविधा स्मार्ट सिटीच्या एक हजार कोटी रुपयांच्या माध्यमातून नागरिकांना मिळत आहेत. आगामी वर्षभरात यातील बहुतांश कामे पूर्णत्वास आल्यास खऱ्या अर्थाने औरंगाबाद शहर स्मार्ट होणार आहे.

स्मार्ट सिटी अभियानाच्या सुरवातीच्या काळात शहराचा एखादा भाग नव्याने विकसित करणे, शहर परिसरात नवीन शहर विकसित करणे यावर मोठा खल झाला. कालांतराने त्यात बदल होत गेले व शहरात राहणाऱ्या नागरिकांना जोपर्यंत दर्जेदार रस्ते, फूटपाथ, पार्किंगच्या सुविधा, सायकल ट्रॅक, डिजिटल शाळा, आरोग्य सुविधा मिळत नाहीत, तोपर्यंत शहरे स्‍मार्ट होणार नाही, म्हणून कामांचा प्राधान्यक्रम बदलण्यात आला. शहरातील रस्‍त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचा विषय अनेक वर्षांपासून गाजत होता.

त्यामुळे ३१७ कोटींची १०८ रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली. यातील २२ रस्ते पहिल्या टप्प्यात पूर्ण होणार आहेत. ही कामे मुंबई आयआयटीच्या देखरेखीखाली दर्जेदार होणार आहेत. शहरातील नागरिकांना विविध तक्रारींसंदर्भात अर्ज करून हेलपाटे मारावे लागायचे. आता ई-गव्हर्नन्स प्रकल्पामुळे ऑनलाइन पद्धतीने तक्रारींची सोय उपलब्ध झाली आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या तक्रारीवर पुढे काय झाले हेदेखील ऑनलाइन पद्धतीने नागरिकांना कळविले जात आहे.

पाण्याच्या वेळापत्रकावरून नागरिकांची मोठी नाराजी होती. ‘जल-बेल’च्या माध्यमातून नागरिकांना पाण्याच्या अचूक वेळा कळत आहेत. १७८ कोटी रुपयांचा एमएसआय प्रकल्प पूर्ण झाला आहे. शहरात सातशे कॅमेरे बसविणे व त्याद्वारे सर्व हालचालींवर पाळत ठेवण्यासाठी स्मार्ट सिटी कार्यालयात व पोलिस आयुक्तालयात ‘कमांड अॅण्ड कंट्रोल सेंटर’ उभारण्यात आले आहे. त्यामुळे गुन्ह्यांच्या तपासात पोलिसांना मदत होत आहे. याचा प्रत्यय अनेकदा आलेला आहे.

शहरातील ऐतिहासिक दरवाजांची डागडुजी, त्यावर लायटिंग, सायकल ट्रॅक, शहागंज येथील ऐतिहासिक घड्याळ व टॉवरचे नूतनीकरण स्मार्ट सिटीतर्फे करण्यात आले. त्यासोबत आगामी काळात स्मार्ट सिटीमार्फत पार्किंग धोरण, राज्यातील सर्वाधिक मोठे प्राणिसंग्रहालय, स्मार्ट एज्युकेशन, नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सुपर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभारले जाणार आहेत. त्यासोबतच क्रांती चौकात शिवसृष्टी, पादचारी पथ व सायकल ट्रॅक, स्मार्ट सिग्नल, लव युअर सिटी मोहीम, स्विपिंग मशीन, सुपरहिरो गार्डन, चौकांचे सुशोभीकरण अशा विविध प्रकल्पाद्वारे शहराचा चेहरामोहरा बदलण्याठी स्मार्ट सिटीने प्रयत्न केला आहे. यामुळे आगामी वर्षभरात शहराचा चेहरामोहरा बदललेला पहायला मिळणार आहे.

दीड कोटी प्रवाशांना सेवा

शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने स्मार्ट सिटीअंतर्गत २३० कोटी रुपये खर्च करून ‘माझी स्मार्ट बस’ प्रकल्प राबविण्यात आला. परवडणारी व अत्याधुनिक यंत्रणाशी सज्ज असलेली बस असे या सेवेचे वैशिष्ट्य आहे. आतापर्यंत दीड कोटी प्रवाशांना या बसने सेवा दिली आहे.

स्मार्ट सिटीतील कामे

 मास्टर सिस्टीम इंटिग्रेटर प्रकल्पात ८०० पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे ४५० चौकात लावणे.

 पोलिस आयुक्तालयात कमांड कंट्रोल सेंटर, स्मार्ट सिटी मुख्यालयात इंटिग्रेटेड कमांड कंट्रोल सेंटर.

 १७ पोलिस ठाण्यांत कॅमेरा फुटेज, व्हीविंग सेंटर. जीआयएस मॅपिंगमध्ये ड्रोन सर्व्हे.

 ई-गव्हर्नन्स प्रकल्पात ऑनलाइन पोर्टल, मोबाइल ॲप, महापालिकेचा कारभार डिजिटल करणे.

 ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन, सुशोभीकरण व रोषणाई.

 ४०० वर्षे जुने १० ऐतिहासिक दरवाजे, तटबंदी आणि शहागंज येथील टॉवरवरचे संवर्धन, रोषणाई.

 स्मार्ट स्कूल प्रकल्पांतर्गत ५४ शाळांना नूतनीकरण.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com