मेहुण्याने चक्क मेहुणीला पळविले! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

son in law and sister in law love story case registered Vaijapur police station

मेहुण्याने चक्क मेहुणीला पळविले!

वैजापूर : लग्न झालेले असतानाही करामती नवऱ्याने पत्नीच्या अल्पवयीन बहिणीला म्हणजेच मेहुणीला सासरवाडीहून पळवून नेल्याची घटना तालुक्यातील धोंदलगाव येथे उघडकीस आली. सालीला पळवून नेल्यामुळे सासरवाडीतील मंडळी हैराण झाल्याने त्यांनी थेट पोलिस ठाणे गाठून जावयाची तक्रार केली आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी जावयासह त्याच्या साथीदाराविरुध्द वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील धोंदलगाव येथील एका कुटुंबातील मुलीचे लग्न दीड वर्षापूर्वी तालुक्यातीलच कापूसवाडगाव येथील एकाशी झाले होते. लग्नानंतर जावयाचे नेहमी घरी येणे-जाणे असल्यामुळे त्याचे सालीशी गुफ्तगू सुरू असायचे. दीर्घ परिचयानंतर अल्पवयीन सालीही मेहुण्याशी विश्वासाने बोलायची. परंतु हा नखरेल मेहुणा एकेदिवशी आपल्यालाच पळवून नेईल, याची पुसटशी कल्पनाही तिला नसावी. परंतु घडले तसेच. ९ मे रोजी मेहुणा धोंदलगाव येथे सासरवाडीला मुक्कामी आला होता. रात्रीच्या सुमारास जावयासह सर्व कुटुंब जेवण आटोपून झोपी गेले.

सकाळी सदरील कुटुंब जागे झाल्यानंतर जावयासह त्यांची अल्पवयीन १७ वर्षीय मुलगी घरातून गायब झालेली त्यांना दिसली. त्यानंतर त्यांनी गावातील नातलगांसह आजूबाजूला दोघांचाही शोध घेतला. परंतु ते सापडले नाही. १० मेरोजी जावयाने मित्राच्या भ्रमणध्वनीवरून सास-याच्या भ्रमणध्वनीवर संपर्क करून तुमच्या मुलीला मी रात्री १२ वाजता घेऊन आल्याचे सांगितल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली.

मी सध्या पुणे जिल्ह्यातील चाकण येथे असून तिला पुन्हा परत घेऊन येण्यासाठी तुम्ही माझ्या मित्राच्या फोन-पेवर दहा हजार रुपये पाठवा, असे सांगितले. त्यानंतर सास-याने गावातून उसनेपासने करून साडेसात हजार रुपये जमा केले एकाच्या फोन - पेवर पाठविले. त्यानंतर सास-याने वारंवार जावयाला फोन करून मुलीला घेऊन येण्यासाठी आर्जव केले. परंतु त्याने तिला घेऊन येण्यास टाळाटाळ केली. लग्न करण्याच्या उद्देशानेच जावयाने माझ्या मुलीला पळवून नेले असल्याचे वडिलांनी पोलिसांना सांगितले.

मुलीची वाट पाहून कुटुंब कासावीस झाले तरीही जावई मुलीला आणून सोडेनात. त्यामुळे सासऱ्याने पत्नीसह तालुक्यातील कापूसवाडगाव येथील जावयाचे घर गाठून व्याह्याकडे आपबीती सांगितली. दरम्यान याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून जावई, त्याचे वडील, मित्र अशा तिघांविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Son In Law And Sister In Law Love Story Case Registered Vaijapur Police Station

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top