esakal | तरुणाचा ग्रामीण भागासाठी 'स्टार्टअप'; शिक्षण घेत सुरू केली कंपनी
sakal

बोलून बातमी शोधा

start up

तरुणाचा ग्रामीण भागासाठी 'स्टार्टअप'; शिक्षण घेत सुरू केली कंपनी

sakal_logo
By
शेखलाल शेख

औरंगाबाद: आपला व्यवसाय, उद्योग, सेवा आदींचे ‘डोअर टू डोअर’ मार्केटिंग, पॅम्प्लेट वाटणे, होर्डिंग लावणे, वाहनाद्वारे माहिती देणे ही पारंपरिक पद्धत बाजूला जाऊन आता सोशल मीडियाच्या माध्यमातून डिजिटल मार्केटिंग मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कमी वेळेत, कमी खर्चात ‘लोकल टू ग्लोबल’ आपला व्यवसाय, सेवा पोचविणे सहज शक्य आहे. शिवाय आपले प्रॉडक्ट, सेवा किती चांगली, दर्जेदार आहे ते ऑनलाइन पद्धतीनेच सांगणे सोपे झाले आहे. भविष्यात डिजिटल मार्केटिंग वाढतच जाणार असल्याने कन्नड (जि.औरंगाबाद) येथील तरुण सुवेध राजेश परदेशी याने ‘सोशल कोष’ नावाने स्टार्टअप सुरू केले आहे. त्यातून ग्रामीण भागातील व्यवसाय, उद्योग, सेवा वृद्धिंगत करण्यासाठी बेवसाईट, ॲप्लिकेशन, डिजिटल मार्केट, ग्राफिक्स डिझाइन, ब्रॅडिंग सुरू केले आहे. त्यासाठी पाच जणांची टीम कार्यरत आहे.

सुवेध राजेश परदेशी हा कन्नड शहरात राहतो. त्याचे २०२० मध्ये बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले असून सध्या पदवीचे शिक्षण सुरू असताना मित्र वरुण सूर्यवंशी यांच्यासह सोशल कोष नावाने कंपनी स्थापन केली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अनेकांचा कल नोकरीकडेच असतो. कमी पगाराची असली तरी बहुतांश जण नोकरी करणे पसंत करतात. अनेक जण व्यवसाय करण्याची धाडस करीत नाहीत. सध्या नोकऱ्यांसाठीही स्पर्धा असल्याने जास्तीत-जास्त लोकांना व्यवसायात यावे, यासाठी सुवेध काम करत आहे. एखाद्याने व्यवसाय, सेवा, लघुउद्योग सुरू केला तर त्याचे मार्केटिंग, ब्रॅडिंग, प्रॉडक्टची ऑनलाइन विक्री करण्यासाठी तो प्रयत्न करतो. विशेष म्हणजे तो ग्रामीण भागावरच लक्ष देतो.

हेही वाचा: हरिभाऊ बागडेंच्या इशाऱ्यानंतर रस्त्यावरील खड्डे अखेर बुजवले

आता बहुतांश व्यवसाय ऑनलाइन होत आहे. कोरोनाकाळात त्यात वाढच झाली. महागड्या वस्तूंपासून भाजीपाल्यापर्यंतच्या वस्तू मागणीनुसार ग्राहकांपर्यंत पोचविला जात आहे. यासाठी डिजिटल मार्केटिंगची गरज पडते. त्यासाठी वेबसाइट, ॲप्लिकेशन तयार करून ऑनलाइन ऑर्डर घेता येतात. ग्रामीण भागात डिजिटल मार्केटिंगद्वारे व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी खूप वाव आहे. त्यानुसार छोटे व्यवसासायिक, सेवा देणाऱ्यांचे कार्य लोकल टू ग्लोबल करण्यासाठी मदत करीत असल्याचे सुवेध परदेशी सांगतो.

हेही वाचा: पोलिसांची साडेबारा हजार पदे भरली जाणार : गृह राज्यमंत्री देसाई

सोशल मीडियाचा वापर-
स्मार्टफोनमुळे सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात विविध प्रॉडक्टची माहिती, व्हिडिओ, लिंक दिसतात. त्या क्लिक करून ऑनलाइन मागणी देता येऊ शकते. संपर्क साधण्याची सुविधाही असते. त्यामुळे डिजिटल मार्केटिंगसाठी सोशल मीडियाच्या सर्व फ्लॅटफॉर्मचा वापर करीत असल्याचे सुवेध परदेशी सांगतो.

loading image