राज्यसेवेला यंदाच उशीर, त्यात पुढील वर्षाचीही फिकीर!

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या- २०१९ च्या राज्यसेवा परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच लागला. दुसरीकडे कोरोनामुळे यंदाची २०२० ची राज्यसेवा पूर्वपरीक्षा अजूनही होऊ शकली नाही. एप्रिलच्या सुरवातीला ठरलेली ही परीक्षा आता सप्टेंबरमध्ये होईल. तेथून पुढे तीन-चार महिन्यांनी मुख्य परीक्षा आणि नंतर मुलाखती होतील. यात पुढील वर्षच उजाडण्याची शक्यता आहे. असे झाल्यास २०२१ च्या परीक्षेचे काय? हा तिढा आता ‘एमपीएससी’नेच मध्यम मार्ग काढून सोडवावा, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांतून व्यक्त होत आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

निकालाचा आनंद; पण... 
राज्यसेवा परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच लागल्यानंतर विद्यार्थी आनंदात आहेत. लॉकडाउनच्या ताणतणावातून विद्यार्थी बाहेर येत आहेत. काहींनी अभ्यासवर्गासाठी पुण्या-मुंबईची वाटही धरली आहे. आता जबाबदारी आहे ती राज्य शासन आणि ‘एमपीएससी’ची. कारण पाच एप्रिलची पूर्वपरीक्षा लॉकडाउनमुळे लांबणीवर टाकल्याची एकच ओळ ‘एमपीएससी’ने वेबसाइटवर टाकली आणि मधले तब्बल दोन महिने आयोग शांतच राहिला. दरम्यानच्या काळात शासनानेही नोकरभरतीवर बंदीचे सूतोवाच केले. त्यामुळे विद्यार्थ्यांची धडधड वाढली. त्यात आता दुसरीच समस्या उभी ठाकणार आहे. २०२० ची पूर्वपरीक्षा सप्टेंबरमध्ये घेण्याचे नियोजित असले तरी त्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याची अट आहे. तसे झाले नाही तर ही परीक्षा पुन्हा लांबणीवर पडू शकते. मग मुख्य परीक्षा आणि त्यानंतर मुलाखती कधी होतील? २०२१च्या परीक्षेचे नियोजन कसे करणार, हा प्रश्‍न आहे. पर्याय म्हणून, यंदाच्या जागांत वाढ करावी किंवा दोन वर्षांच्या परीक्षा एकत्र घ्याव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांतून जोर धरत आहे. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

विद्यार्थ्यांशी संवाद हवा होता 
राज्यकर विभागाचे सहायक आयुक्त चंद्रशेखर बोर्डे म्हणाले, की लॉकडाउनच्या काळात आयोगाने संवाद तोडल्यासारखी स्थिती होती. खरे म्हणजे त्या काळात आयोगाने अधूनमधून सूचना टाकून विद्यार्थ्यांना धीर द्यायला हवा होता. तसे झाले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनीही हातपाय गाळले. आताही राज्यसेवेच्या तारखा ‘रिवाईज’ करताना आयोगाने हे सांगायला हवे होते, की पूर्व परीक्षेचा निकाल आम्ही आठच दिवसांत घोषित करतो. नंतर ४५ दिवसांनंतर मुख्य परीक्षा घेतो, मुलाखती फेब्रुवारीत होतील; पण तेही झालेले नाही. तसेच दोन परीक्षा एकत्र होण्याची शक्यता कमीच आहे. लॉकडाउन विद्यार्थ्यांसाठी चांगली संधी होती. जी परीक्षा त्यांना ५ एप्रिलला द्यायची होती ती आता सप्टेंबरमध्ये देण्याची संधी आहे. त्यामुळे दोन परीक्षांचा आग्रह आयोगाकडे धरणे संयुक्तिक नाही. कारण आधीच साडेचार महिने विद्यार्थ्यांना जास्तीचे मिळालेत. 

विद्यार्थ्यांनो, ऑनलाइन साहित्य वापरा 
स्पर्धा परीक्षेचे ज्येष्ठ मार्गदर्शक सुशील रगडे यांच्या मते, लॉकडाउनच्या काळात स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी ताणतणावात होते. अडचणींमुळे बरेच विद्यार्थी गावी गेल्याने त्यांचे अभ्यास साहित्य शहरांतच राहिलेले आहे. शिवाय बाजारातही पुस्तके उपलब्ध नाहीत. याचा ताण येणे साहजिक आहे. तरीही याचा बाऊ न करता विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अभ्यास साहित्याचा वापर करावा. दर्जेदार सोशल साइटवरील ऑनलाइन व्हिडिओंचा वापर करावा. शिवाय पीडीएफ स्वरूपातील साहित्यही संदर्भासाठी उपयुक्त ठरेल. आणखी एक बाब म्हणजे, मागच्या वर्षी ४२० जागा होत्या, यंदा २०० जागांचीच जाहिरात आहे. परिणामी ‘कट ऑफ’ वाढणारच. आधीच विद्यार्थी नैराश्‍यात आहेत, याचा विचार करून जागांमध्ये वाढ करावी. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com