Chhatrapati Sambhajinagar News : कोसळली झाडे... साचले पाणी... फुटले बांध...; जिल्हाभरात दाणादाण

अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची त्रेधातिरपीट झाली. काहींच्या घरात पावसाचे पाणी शिरले. कित्येक घरे गळाल्यामुळे रात्र जागून काढण्याची वेळ आली.
Agriculture Loss
Agriculture LossSakal

छत्रपती संभाजीनगर/वाळूज - वादळी वाऱ्यासह अवकाळी कोसळलेल्या मुसळधारेमुळे जिल्हाभरात रविवारी रात्री जनजीवन विस्कळीत झाले. रात्रभर धोधो झालेल्या पावसाने रब्बी पिकांना जीवदान मिळाले असले तरी वेचणीला आलेला कापूस, काढणीला आलेला मका, तूर आदी पिके भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

चार दिवसांपासून परिसरात ढगाळ वातावरण होते. सकाळी आठच्या सुमारास हलकासा पावसाचा शिडकावा झाला. त्यानंतर दिवसभर आभाळ भरलेलेच होते. सायंकाळी सहानंतर ढग दाटून आले. सोसाट्याचा वारा सुटला आणि अधूनमधून पावसाची रिपरिप सुरू झाली. पाहता पाहता साडेसातनंतर ती वाढत गेली. रात्री पावणेदहाच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू झाला. हा पाऊस साडेअकरापर्यत अगदी धोधो कोसळला.

अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची त्रेधातिरपीट झाली. काहींच्या घरात पावसाचे पाणी शिरले. कित्येक घरे गळाल्यामुळे रात्र जागून काढण्याची वेळ आली. यंदाच्या पावसाळ्यातही एवढ्या जोराचा पाऊस झाला नाही, तेवढा हा पाऊस झाला. दरम्यान, वीजपुरवठाही रात्रभर खंडीत राहिल्याने अडचणीत भर पडली.

झाडे कोसळली

पावसासोबत वादळी वारे होते. या वाऱ्याचा जोर जास्त असल्याने अनेक मोठमोठी झाडे जमीनदोस्त झाली. वाळूज ते नायगव्हाण खंडेवाडी रस्त्यावर मोठे बाभळीचे झाड आडवे कोसळले. त्यामुळे तब्बल १४ तास वाळूज ते नायगव्हाण खंडेवाडी रस्ता बंद होता. वाळूज परिसरातून नायगव्हाण खंडेवाडी एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये जाणाऱ्या कामगारांना कामावर जाण्यासाठी पाटोदा मार्गाने जाणे भाग पडले.

आठवडे बाजारावर चिखलात

रविवारी रात्रभर धोधो पाऊस झाला. पहाटे पाचपर्यंत पाऊस सुरू होता. सोमवारी सकाळी पावणेबाराच्या सुमारासही जोरदार सरी कोसळल्या. दर सोमवारी वाळूजला आठवडे भरतो. रात्रभर पाऊस कोसळल्याने बाजारतळावर सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले. हा चिखल बाजूला करीत आठवडे बाजारात व्यावसायिकांनी दुकाने थाटली. ग्राहकांना नाईलाजाने चिखल तुडवत भाजीपाला खरेदी करणे भाग पडले.

देवगाव रंगारीला अवकाळीने झोडपले

देवगाव रंगारी: परिसरात काही गावांमध्ये रविवारी (ता.२६) रात्री वादळी वाऱ्यासह बेमोसमी पावसाने हजेरी लावली. यात कापूस, ज्वारी पीक आडवे झाले. तर इतर पिकांचेही मोठ्या नुकसान झाले आहे. यामुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली.

परिसरात मका, गहू पिके वादळ वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाली आहेत. कल्याण खुर्द येथील पंढरीनाथ बोरसे यांच्या दोन एकर शेतातील मका जमीन दोस्त झाला असून वावडे परिसरात पिकांची हानी झाली. वादळी वाऱ्याने वीज तारांवर झाड पडल्याने परिसरात वीजपुरवठा खंडित झाला होता. तर अनेक झाडं उन्मळून पडली होती. यावर्षी पावसाळ्यात पाऊस नसल्याने कापूस व मका पिकाचे उत्पादन कमी आहे.

त्यातच काल झालेल्या पावसाने वेचणीसाठी फुटलेल्या कापसाच्या वाती तयार झाल्या आहेत. रविवारी झालेल्या पावसामुळे व्यापाऱ्यांनी खरेदी केलेली मकाही बाजार समितीच्या आवारात उघड्यावरच वाळण्यासाठी ठेवली होती. त्यात अचानक आलेल्या धो धो पावसामुळे मका भिजून व्यापाऱ्यांचेही नुकसान झाले.

पंचनाम्याची मागणी

परिसरात अवकाळीने रब्बी पिकाचे नुकसान झाले आहे. यात कोरडवाहू मका, ज्वारी, आदी रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन सरसकट पंचनामे करून शासनाने मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

गारपीट अन् मुसळधार पावसाने पिके भुईसपाट

पाचोड : पाचोडसह (ता.पैठण)परिसरात रविवारी (ता.२६) रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास जोरदार वादळी वारे व मुसळधार पावसासह पाच मिनिटे जोमाने गारपीट होऊन पिके उद्ध्वस्त झाली.

पाचोडसह थेरगाव, मुरमा, बोडखा, लिंबगाव, हर्षी, वडजी, दादेगाव, खादगाव, रांजणगाव दांडगा आदी ठिकाणी वादळी वारे व पाच मिनीटे जोरदार मुसळधार पाऊस व बोरांच्या आकाराची गारपीट होऊन वेचणीस आलेल्या कापसासह फुलोऱ्यातील तूर, बाळसे धरलेले ज्वारी, उसाचे पीक आडवे होऊन तोंडाचा घास हिरावला गेला.

तर काही ठिकाणी ऐन पोटऱ्यातील ज्वारी, गहु व हरभऱ्याच्या पिकांसह फळे व भाजीपाल्याचे फडही भुईसपाट होऊन आडवे झाले. मृग बहराने लगडलेल्या मोसंबी व डाळिंबाच्या बागास गारपिटीमुळे मोठा फटका बसला. काही ठिकाणी पपई व केळीच्या बागांचे गारपीट व वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान होऊन झाडे व फळ लगडलेले घड तुटून पडले. एकंदरीत जोमदार अर्धा तास वादळी वाऱ्यामुळे शेतातील पिके भुईसपाट होऊन होत्याचे नव्हते झाले.

पावसामुळे परिसरात मकाचे नुकसान

नाचनवेल : भिलदरी -शफियाबाद (ता.कन्नड) येथे पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. रविवारी (ता.२६) रात्रभर संततधार पावसामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरले त्यामुळे काही शेतकऱ्यांना रात्रभर जागून काढावी लागली. पाणी घरात असल्यामुळे व धान्य खाण्यापिण्याच्या साहित्याचे नुकसान झाले. काही शेतात मका पावसाच्या पाण्यात तरंगल्याचे दिसून आले. तसेच झाडे कोलमडून पडल्याने काही ठिकाणी रस्ते बंद झाले होते. रस्त्यावरचे झाडे बाजूला सारून वाट मोकळी केली.

वाळूज ते खंडेवाडी रस्त्याचा संपर्क तुटला

खामनदीसह ओढे-नाले प्रथमच खळाळले

काढणीला आलेला मका, तुरीचेही नुकसान

घरात पाणी शिरल्याने रात्र जागून काढण्याची वेळ

देवगाव रंगारी परिसरात पिके जमीनदोस्त

पैठणमध्ये गारपिटीचा फळबागांना फटका

कन्नड तालुक्यात अनेकांचा भिजला मका

पावसाळ्यात झाला नाही, एवढा हिवाळ्यात कोसळला

यंदाच्या पावसाळ्यात खाम नदीला पूर आला नव्हता. मात्र, रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे खामनदीही खळाळली. ही नदी दुथडी भरून वाहिल्याने काहीअंशी विहिरींची पाणी पातळी वाढेल. नदीला पूर आल्याने शेतकऱ्यांनी नदीकाठी बसवलेले कृषीपंपही पाण्यात बुडाले. या पावसाने ओढे-नालेही खळखळून वाहिल्याने पावसाळ्यात झाला नाही, एवढा हिवाळ्यात कोसळल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती.

कापसाच्या बोंडांच्या वाती

कापूस, ज्वारी पिकात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले. कित्येक शेतांचे बांध फुटून माती वाहून गेल्याच्या घटना घडल्या. अनेक शेतकऱ्यांच्या कापूस वेचण्या सुरू आहेत. अशातच अवकाळी पावसाने वेचणीला आलेला कापूस भिजला. त्याच्या झाडांवरच वाती झाल्या. आता हा कापूस काळा पडून नुकसान होणार आहे. काढणीला आलेला मका, तूर आदी पिके भिजल्याने नुकसान झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com