Teachers Day 2021: शिक्षकच यशाची ‘गुरु’किल्ली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Teachers Day 2021: शिक्षकच यशाची ‘गुरु’किल्ली

शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी, अधिकारी यांनी आठवणींना उजाळा देत कृतज्ञता व्यक्त केली.

Teachers Day 2021: शिक्षकच यशाची ‘गुरु’किल्ली

औरंगाबाद: कुणीच आईच्या उदरातून शिकून येत नाही. अनुभवातून, शाळेतून, अवती-भवतीच्या माणसांपासून व्यक्ती शिकत राहतो. यात शाळा, कॉलेजमधील शिक्षकांना अनन्य महत्त्व आहे. त्यामुळेच भारतीय संस्कृतीत तर शिक्षकांना ‘गुरुर ब्रह्मा’ असे संबोधले आहे. शिक्षकच यशाची गुरुकिल्ली ठरतात. त्यामुळे शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी, अधिकारी यांनी आठवणींना उजाळा देत कृतज्ञता व्यक्त केली.

इम्तियाज जलील (खासदार, औरंगाबाद): माझ्या वाटचालीत शिक्षकांचा मोठा वाटा आहे. गणिताचे शिक्षक बऱ्याचदा रागवावयाचे, कधीकधी मारायचे. मला जरी त्यावेळेस त्यांचा राग आला असेल पण आज जो मी आहे तो फक्त मला आयुष्यात भेटलेल्या शिक्षकांमुळे. आतापर्यंतच्या वाटचालीत माझे अनेक गुरू आहेत. माझ्या आयुष्यातील सर्व शिक्षकांचा मी कायम ऋणी असेन.

ओमराजे निंबाळकर (खासदार, उस्मानाबाद): माझ्या शिक्षकांच्या अनेक आठवणी आहेत. मला शिक्षकांनी वेळोवेळी प्रोत्साहित केले. चुकल्यावर रागावलेही. राजकीय आयुष्यात गणपतराव (आबा) देशमुख माझे सर्वांत आवडते गुरू. विधानसभेत मी नवखा असताना आबांकडून मला विधानसभा कशी चालते, आपले इथले वर्तन कसे असले पाहिजे ते आपल्या भागातील प्रश्न सभागृहात कसे मांडले पाहिजेत, या महत्त्वपूर्ण गोष्टी शिकायला भेटल्या.

तान्हाजी मुटकुळे (आमदार, हिंगोली) : शिक्षकांनी अध्यापनाबरोबर दिलेले माणुसकीचे धडे आजही गिरवत आहे. त्यामुळे गुरुजींनी दिलेले ज्ञान चंद्र, सूर्य आहे तोपर्यंत कायम राहील. समाजात वावरताना माणुसकी जपण्याचे व अध्यापनाचे काम शिक्षक करतात.

सुनील चव्हाण (जिल्हाधिकारी, औरंगाबाद): माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेमध्ये झाले. ना. वा. कुलकर्णी, भागवत सर यांच्यामुळे माझी इंग्रजी चांगली झाली. जी. डी. देशपांडे सर यांच्यामुळे मराठी उत्तम होण्यास मदत झाली. प्रकाश बाळ, संजय चौधरी यांचाही माझ्या जडणघडणीत मोठा वाटा आहे.

डॉ. विपिन इटनकर (जिल्हाधिकारी, नांदेड) ः शाळेपासून ते महाविद्यालयापर्यंत अनेक शिक्षक, प्राध्यापकांचे मला मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले. त्याचबरोबर आई-वडील आणि नंतर पत्नी यांचा माझ्या जडणघडणीत मोठा वाटा. तेदेखील माझे शिक्षकच आहेत.

अभिमन्यू पवार (आमदार, औसा) ः माझ्या वाटचालीत केशवराज शाळेतील शिक्षकांचा आणि गुरुजनांचा खूप मोठा प्रभाव आहे. कॉलेज जीवनात आमचे एच. आर. कोटलवार सर यांचेही मार्गदर्शन लाभले. राजकीय आयुष्यात माझे सर्वात महत्त्वाचे गुरू देवेंद्र फडणवीस आहेत.

संतोष बांगर (आमदार, कळमनुरी) ः आमच्या गुरुजींनी दिलेले धडे आजही माझ्या सामाजिक व राजकीय जीवनात उपयोगी पडत आहेत. प्रार्थनेच्या वेळी घेण्यात येणाऱ्या प्रतिज्ञांमधून सामाजिक भावना व कार्य करण्याला बळ मिळाले.

विजया रहाटकर (भाजप, राष्ट्रीय सचिव) ः माझ्या शैक्षणिक आणि राजकीय प्रवासात अनेक गुरू मिळाले. शालेय शिक्षणादरम्यानच्या आमच्या सुनीता कुलकर्णी मॅडमचा माझ्यावर मोठा प्रभाव आहे. त्यां कविता खूप प्रभावीपणे शिकवायच्या. या प्रेरणेतूनच मी ‘कविताबाग’ सुरू केली. राजकीय क्षेत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझे गुरू आहेत.

टॅग्स :aurangabad