औरंगाबाद : तात्पुरती टळली शहराची कचराकोंडी; कामगारांनी काम बंद आंदोलन मागे

सफाई कामगारांनी काम बंद आंदोलन घेतले मागे : किमान वेतनाची मागणी
temporarily avoided Aurangabad city garbage workers went strike
temporarily avoided Aurangabad city garbage workers went strikesakal

औरंगाबाद : किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी करावी, यासह इतर मागण्यांसाठी शहरात साफसफाईचे काम करणाऱ्या पी. गोपीनाथ रेड्डी कंपनीच्या सुमारे ११०० कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून (ता. १४) काम बंद आंदोलन सुरू केले. त्यामुळे दिवसभर शहरातील एकाही भागात घंटागाडी गेली नाही. जागोजाग कचऱ्याचे ढीग पडून होते. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेत आमदार अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन शिवजयंतीनिमित्त उत्साहाचे वातावरण असताना, शहराची कचराकोंडी करणे योग्य नाही, त्यामुळे आंदोलन मागे घेण्याचे आवाहन करण्यात आले. या प्रश्‍नावर आता २१ फेब्रुवारीला बैठक आयोजित करण्यात आली आहे.

महापालिकेने शहरात घरोघरी जाऊन कचरा संकलन करणे व त्याची कचरा प्रक्रिया केंद्रापर्यंत वाहतूक करण्याच्या कामासाठी पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीला काम देण्यात आले आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये कंपनीला कार्यारंभ आदेश देण्यात आले. महापालिका प्रतिटन १६८७ रुपये भाव देत आहे. मात्र शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग साचत असल्याने महापालिकेने कंपनीला वारंवार दंड केला आहे. तसेच सफाई कामगारांना किमान वेतन व सोयी सुविधा मिळत नसल्याने कंपनी वादात सापडली आहे. किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी, अन्यथा काम बंद आंदोलन करण्याचा इशारा कामगार शक्ती संघटनेतर्फे तीन दिवसांपूर्वी महापालिका व कंपनीला दिला होता. पण त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे सोमवार सकाळपासून कामगारांनी आंदोलन सुरू केले.

घंडागाड्याचे चालक त्यावर काम करणाऱ्या कामगारांनी वाहने थांबवून ठेवली. काही भागात घंटागाड्या आल्या. त्यांनी कचरा उचलण्याच्या पॉइंटपर्यंत कचरा नेला पण पुढे ट्रक चालकांनी प्रक्रिया केंद्रापर्यंत कचरा नेलाच नाही. त्यामुळे शहराच्या अनेक भागात कचरा तसाच पडून होता. दरम्यान दुपारी महापालिकेत अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने यांच्या दालनात आमदार अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.

यावेळी कामगार शक्ती संघटनेचे गौतम खरात, माजी उपमहापौर किशोर थोरात, उपायुक्त सौरभ जोशी, संतोष टेंगळे उपस्थित होते. यावेळी शिवजयंतीचा उत्सव तोंडावर आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण देखील याच दरम्यान होणार आहे. त्यामुळे कामगारांनी आंदोलन स्थगित करावे. महापालिकेचे प्रशासक शहरात आल्यावर त्यांच्यासोबत सोमवारी (ता. २१) संबंधितांची बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल, असा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दोन दिवसांपासून कचरा घरातच

रविवारी सुटीमुळे घरोघरी कचरा उचलला जात नाही. त्यात सोमवारी कामगारांनी आंदोलन सुरू केले. त्यामुळे दोन दिवसांपासून नागरिकांच्या घरात कचरा पडून आहे. कामगारांचा विषय कंपनीचा आहे. त्यामुळे कंपनीवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी कॉंग्रेसचे माजी गटनेते भाऊसाहेब जगताप यांनी केली.

''शिवजयंतीचा उत्सव लक्षात घेऊन आमदार अंबादास दानवे यांनी आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली, त्यानुसार आंदोलन स्थगित करण्यात आले. २१ फेब्रुवारीला बैठक होणार आहे. त्यात सकारात्मक निर्णय होईल, अशी आशा आहे.''

-गौतम खरात, संस्थापक अध्यक्ष, कामगार शक्ती संघटना.

''शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर काम बंद आंदोलन करू नका अशी विनंती आमदार अंबादास दानवे यांनी केली, त्याला प्रतिसाद देत कामगारांनी आंदोलन स्थगित केले. याविषयी पुन्हा २१ फेब्रुवारीला बैठक होणार आहे.''

-सौरभ जोशी, उपायुक्त, महापालिका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com