esakal | औरंगाबाद शहरात शाळांबरोबर सुरू होणार आजपासून कनिष्ठ महाविद्यालये
sakal

बोलून बातमी शोधा

0school_141_1

राज्य सरकारच्या निर्देशानुसार इयत्ता नववी आणि दहावीपर्यंतच्या शाळा आज सोमवारपासून ( ता.चार) सुरू करण्याचा महापालिकेने निर्णय घेतला आहे.

औरंगाबाद शहरात शाळांबरोबर सुरू होणार आजपासून कनिष्ठ महाविद्यालये

sakal_logo
By
मधुकर कांबळे

औरंगाबाद : राज्य सरकारच्या निर्देशानुसार इयत्ता नववी आणि दहावीपर्यंतच्या शाळा आज सोमवारपासून ( ता.चार) सुरू करण्याचा महापालिकेने निर्णय घेतला आहे. शाळेसोबतच ११ वी व १२ वीचेही वर्ग सुरू करण्यास परवानगी दिल्याचे महापालिका प्रशासक तथा आयुक्‍त आस्तिककुमार पांडेय यांनी म्हटले आहे. तथापि, आगामी १५ दिवसांतील कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेऊन नंतर प्राथमिक शाळा व खासगी कोचिंग क्लासेस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. राज्यात कोरोना संसर्गामुळे शाळा-महाविद्यालये बंद होती.

दरम्यान विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिकवणी सुरू होती. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य सरकारने मिशन बिगेन अगेनअंतर्गत टप्प्याटप्प्याने सर्व व्यवहार सुरळीत केले आहे. त्यानुसार शिक्षण विभागानेही शाळा सुरु करण्याचे नियोजन केले आहे. पहिल्या टप्प्यात ग्रामीण भागातील शाळा सुरु करण्यात आल्या. त्यानंतर महापालिका हद्दीतील शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला. २० नोव्हेंबरपर्यंत दिवाळीच्या सुट्या होत्या. दरम्यान, शहरात कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने महापालिका शाळांसह खासगी अनुदानित व विनाअनुदानित सर्व शाळा ३ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचे महापालिकेने जाहीर केले होते. आता शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शहरात इयत्ता नववी, दहावी, अकरावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्यास परवागनी देण्यात आली आहे. त्यानुसार सोमवार ( ता. चार ) पासून हे वर्ग सुरू होत आहे.

दरम्यान शाळा सुरू होण्यापुर्वी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर कोरोना चाचणी करून त्याचा अहवाल मुख्याध्यापकांनी सादर करावा, असे आदेश महापालिका उपायुक्तांनी जारी केले आहेत. दरम्यान आयुक्‍त श्री. पांडेय यांनी शहरातील प्राथमिकच्या शाळा आणि खासगी कोचिंग क्लोसस सुरू करण्याबाबत अद्याप निर्णय घेतला नाही. पुढील पंधरा दिवसांत कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन त्यानंतर प्राथमिकच्या शाळा आणि खासगी कोचिंग क्लासेस सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी कळवले आहे.


शाळांची लगबग
सोमवारपासून दहावी ते बारावीचे वर्ग सुरू होणार असल्याने शहरातील विविध शाळांत शालेय प्रशासनाची रविवारी लगबग दिसून आली. कोरोनाच्या नियमांचे पालन व उपाययोजना करण्यात आल्या. शाळांच्या वर्गखोल्यांत निर्जंतुकीकरण करण्यात आले. प्रशासनाने दिलेल्या डेडलाइन नुसार महापालिकेच्या विविध आरोग्य केंद्रांवर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणीही करण्यात आली. चाचणीसाठी काही केंद्रांवर गर्दी दिसून आल्याचे आरोग्य विभागाकडून कळवण्यात आले आहे.

Edited - Ganesh Pitekar

loading image