esakal | सामाजिक बांधिलकी! दफनविधीसाठी कब्रस्तानात चोवीस तास सेवा

बोलून बातमी शोधा

Aurangabad
सामाजिक बांधिलकी! दफनविधीसाठी कब्रस्तानात चोवीस तास सेवा
sakal_logo
By
शेखलाल शेख

औरंगाबाद: सध्या कोरोना, लॉकडाउन अशा संकटाच्या काळात अनेक संस्था, व्यक्ती आपल्या परीने कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आपली सेवा देत आहेत. सिडको एन-सहा येथील बखी कब्रस्तानमध्ये असेच आगळेवेगळे काम रहेमानिया तदफीन कमिटी करत आहे. यामध्ये १४ तरुण दफनविधी पार पाडण्यासाठी चोवीस तास आपली सेवा मोफत देत आहे. सुरवातीला कोरोना रुग्णाचा मृतदेह आला तर अनेक जण घाबरत होते. मात्र, या तरुणांनी न घाबरता कोरोना रुग्णांचे दफनविधी केले. आतापर्यंत त्यांनी बखी कब्रस्तानात जवळपास चाळीस कोरोना बाधितांच्या मृतदेहांचा दफनविधी केला आहे.

१८ वर्षांपूर्वी समितीची स्थापना-

अठरा वर्षांपूर्वी एकत्र येऊन या कमिटीची स्थापना झाली. आज या समितीमध्ये १४ तरुणांचा समावेश आहे. परिसरात एखाद्या घरात कुणाचे निधन झाले तर सर्वांत अगोदर फोन या समितीमधील कोणत्याही एका सदस्यांना जातो. फोन आल्यानंतर या समितीमधील सदस्यांची कब्रस्तानाकडे जाण्याची लगबग सुरू होते. जे सदस्य त्या दिवशी कोणत्याही कामावर गेले नाही, ज्यांच्याकडे वेळ आहे असे सर्व सदस्य कब्रस्तानमध्ये जमतात. मग सुरू होते दफनविधीची तयारी. सर्वजण एकत्र येऊन कब्रस्तानात दफनविधीसाठी कब्र तयार करतात. ही कब्र विशिष्ट पद्धतीनेच तयार करावी लागते. यानंतर नातेवाइकांच्या उपस्थितीत पूर्ण दफनविधी होईपर्यंत हे सर्व सदस्य या ठिकाणीच असतात.

हेही वाचा: स्कोअर १५, रुग्णालयाचा नकार, तरी भीमाबाईंनी केला कोरोनाचा प्रतिकार!

तरुणांकडून सर्व सेवा मोफत-

येथे कब्र तयार करण्यासाठी (खोदण्यासाठी) येथे कुणाला पैसे देण्याची गरज नाही. सर्व सदस्य आपापल्या परीने ही सेवा अगदी मोफत देतात. या ठिकाणी अनेक वेळा गरीब कुटुंबातील एखाद्या सदस्याचे निधन झाल्यावर त्यांच्याकडे पैसे नसतात. अशावेळी दफनविधीसाठी फरशी, कफनसुद्धा ही समिती लोकवर्गणी करून मोफत देण्याचा प्रयत्न करते. विशेष म्हणजे, ही सेवा देण्यासाठी या तरुणांना अनेक वेळा जास्त वेळ द्यावा लागतो. अनेक वेळा तर रात्री उशिरापर्यंत, अगदी सकाळी किंवा रात्रभरसुद्धा कब्रस्तानात थांबावे लागते. समितीतील सर्व सदस्य हे सर्वसाधारण गरीब कुटुंबातील आहेत. प्रत्येक जण मजुरी, व्यवसाय, कामधंदा करतात. या समितीमधील शेख रशीद, शेख मोहसीन, शेख सगीर, शेख मतीन, शेख समीर, शेख इद्रिस, शेख आसेफ, शेख सद्दाम, शेख शाहरूख, शेख जब्बार, शेख अय्युब, शेख अलताफ, शेख जावेद, शेख रईस आपली सेवा देत आहे.

हेही वाचा: Coronavirus| सौम्य लक्षणे असल्यास रेमडेसिव्हिरची गरज नाही

आतापर्यंत आम्ही जवळपास ४० कोरोनाग्रस्त रुग्णांचा दफनविधी केला आहे. यामध्ये काही रुग्ण हे बाहेर गावातील सुद्धा आहे. यासाठी आम्ही पीपीई किट, ग्लोज, सॅनिटायझर स्वतःच्या पैशाने खरेदी करतो.

- शेख रशीद (सदस्य)

सर्वजण भाड्याच्या घरात राहतात. मजुरी करतात. मिळेल तो व्यवसाय करतात. मात्र सामाजिक बांधिलकीतून आम्ही आमची सेवा देत असतो. आजही दररोज तीनपेक्षा जास्त मृतदेह दफनविधीसाठी येतात.

- शेख मोहसीन (सदस्य)

आम्ही सामाजिक जाणिवेतून हे काम करतोय. जो सदस्य ज्या दिवशी फ्री असेल तो सदस्य कब्रस्तानात सेवा देतो. सध्या लॉकडाउन असल्याने अनेकांचे काम, मजुरी बंद आहे. परिस्थिती बिकट असली तरी आम्ही सेवा देतोय.

- शेख सगीर (सदस्य)