धार जिल्ह्यात बस अपघातातील मृतांत पाचोड, कन्नडमधील दोघे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Two from Pachod, Kannada died in bus accident in Dhar district

धार जिल्ह्यात बस अपघातातील मृतांत पाचोड, कन्नडमधील दोघे

पाचोड/कन्नड - मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यातील खलघाट येथील बलकवाडा-खलटाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत नर्मदा नदीच्या पुलावरून बस कोसळून सोमवारी (ता. १८) झालेल्या अपघातात पाचोडच्या (ता. पैठण) वृद्धासह कन्नड शहरातील तरुण ठार झाल्याची घटना घडली आहे.

जगन्नाथ हेमराज जोशी (वय ७०, रा. पाचोड ता. पैठण, जि. औरंगाबाद) चेतन रामभाऊ जांगीड (वय-३०, रा. शांतिनगर, कन्नड) अशी या दोघांची नावे आहेत. सूत्रांनी सांगितले की, जगन्नाथ जोशी हे मुळचे मल्लाडा (ता. सराडा, जि.उदयपूर राजस्थान) येथील रहिवासी होते. ते ४० वर्षांपासून पाचोड येथे कुटुंबीयांसमवेत वास्तव्यास होते. ते हॉटेल व्यवसाय करून आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालवीत. सहा जून रोजी मुलगा प्रकाश जोशी यांनी जगन्नाथ जोशी यांचा वाढदिवस थाटात साजरा केला. त्यानंतर ते पत्नीला सोडण्यासाठी मल्लाडा (राजस्थान) गेले होते.

पत्नीला आई वडिलांकडे गावी सोडून ते परत पाचोड येथे येत असताना बसचा हा अचानक अपघात झाला. यात ते ठार झाले. त्यांनी पाचोडला येताना बसमध्ये बसण्यापूर्वी मुलगा प्रकाश यास मोबाईलवरून आपण येत असल्याची कल्पना दिली होती. त्यांच्यात मोबाईलवरून झालेले सकाळी साडेसात वाजेचे संभाषण अखेरचे संभाषण ठरले. मुलाने बसमध्ये येण्यास नकार दिल्यानंतरही त्यांनी या बसने प्रवास केला, अन् काळाने घाला घातला. जगन्नाथ यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. त्यांचा मृतदेह धार येथील रूग्णालयात ठेवण्यात आलेला असून मंगळवारी (ता.१९) त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सुभाष मेहता यांनी सांगितले. अपघाताचे वृत समजताच पाचोड येथील राजस्थानी व्यावसायिकांनी दुकाने बंद करून ते अंत्यविधीसाठी राजस्थान येथे गेले.

दरम्यान, कन्नड येथील चेतन जांगीड हा मेहुणे ताराचंद जांगीड यांच्याकडे अठरा वर्षांपासून भुयारी काम करतो. लहानपणीच त्यांच्या वडीलांचे निधन झाले आहे. विवाहासाठी मुलगी पाहण्यासाठी चेतन गावी नांगडकला, (जि. जयपूर, राजस्थान) येथे गेला होता. मुलगी पाहून तो सदरील बसने कन्नडकडे परतत होता. मात्र, बसचा अपघात झाल्याने या तरुणाचे विवाहाचे स्वप्न अधुरेच राहिले. चेतनने सकाळी साडेआठ वाजता मेव्हण्याशी मोबाईलवर संवाद साधला. तो संवाद अखेरचा ठरला.

मध्य प्रदेशातील बलकवाडा येथील खलटाका पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या नर्मदा नदीच्या पुलावर मृतदेहाची ओळख पटवून रात्री उशिरा चेतन यांचा मृतदेह मेहुणे ताराचंद जांगीड यांनी ताब्यात घेतला.

Web Title: Two From Pachod Kannada Died In Bus Accident In Dhar District

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..