मुलीच्या हौसेपोटी चिमुकलीचे सासू-सुनेने केले अपहरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad

मुलीच्या हौसेपोटी चिमुकलीचे सासू-सुनेने केले अपहरण

औरंगाबाद : मुलीच्या हौसेपोटी तीन वर्षीय चिमुकलीचे अपहरण (Girl Kidnapped) करणाऱ्या सासू-सुनेला एमआयडीसी सिडको पोलिसांनी जालन्यातून (Jalna) अटक केली. त्यांची न्‍यायालयीन कोठडीत रवानगी करण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी डी. एस. वमने यांनी शुक्रवारी (ता.२०) दिले. वनमाला मुन्नालाल शर्मा (वय ५२) व राधा रवी शर्मा (२७, दोघी रा. लालबाग झोपडपटटी, राजीवनगर, देऊळगांव राजा रोड, जालना) अशी अपहरण करणाऱ्या सासू-सुनेची (Aurangabad) नावे आहेत. या दोघींनी धूत हॉस्पिटलजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या झोपडीतून गुरुवारी (ता. बारा) रात्री सव्वाबाराच्या सुमारास या चिमुकलीचे अपहरण केले होते. जालना शहरातील राजीवनगर झोपडपट्टीत अवैध दारू विक्री करणारी वनमाला आणि तिची सून राधा शर्मा राहतात.

हेही वाचा: औरंगाबाद-जालना महामार्गावर मोठ- मोठे खड्डे; पाहा व्हिडिओ

राधाला चार मुले होते, त्यापैकी दोन मुलांचा मृत्यू झालेला आहे. वनमाला हिला सून राधाला मुलगी असावी अशी अपेक्षा होती. मात्र, तिला मुलेच झाली. त्यामुळे दोघींनी मिळून मुलीचे अपहरण करण्याचा डाव आखला. त्यासाठी त्या दोघीही रिक्षाने १२ ऑगस्ट रोजी जालना येथून औरंगाबादला आल्या. रात्री सव्वा बाराच्या सुमारास त्या धूत हॉस्पिटलजवळ पोचल्या.तिथे रस्त्यालगत अनेक मजूर मोलमजुरी करून कुटुंबियांसोबत झोपडीत राहतात. त्यातील एका झोपडीत झोपलेल्या तीन वर्षीय बालिकेचे रिक्षातून अपहरण करून जालन्याला नेले होते. मध्यरात्री आरोही झोपलेल्या जागेवर दिसून आली नाही. त्यामुळे त्यांनी एमआयडीसी सिडको पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत एमआयडीसी सिडको ठाण्याचे निरीक्षक विठ्ठल पोटे यांनी तात्काळ बालिकेचा शोध घेण्याबाबत कर्मचाऱ्यांना सूचना केल्या.

हेही वाचा: औरंगाबाद पालिकेवर भाजपचा झेंडा फडकवू, रावसाहेब दानवेंची गर्जना

पोलिस शिपाई देवीदास काळे यांनी रात्रीचे स्मार्ट सिटीच्या कॅमेरातून वेगवेगळ्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज जमा केले. त्यात त्यांना काही धागेदोरे हाती लागले. त्यानुसार उपनिरीक्षक ए. डी. नागरे यांनी पथकासह थेट जालना गाठले. वनमाला आणि राधा शर्मा या सासू सुनेला शुक्रवारी (ता. वीस) अटक करत, बालिकेची सुखरुप सुटका केली. व तीच्या कुटूंबाच्या स्वाधीन केले. ही कारवाई पोलिस निरीक्षक विठ्ठल पोटे यांच्यासह उपनिरीक्षक ए. डी. नागरे, मिरा लाड, गुन्हे शाखेचे पवन इंगळे, जमादार ओहळ, शिपाई काळे, दाभाडे व सुंदर्डे यांनी केली.

Web Title: Two Women Kidnapped Three Years Old Girl In Aurangabad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :aurangabad