मतदान केंद्राच्या १०० मीटर
परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
----------
पदवीधर निवडणुकीसाठी उद्या मतदान
सकाळ वृत्तसेवा
परभणी, ता. २१ ः पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील ७६ मतदान केंद्रांवर शुक्रवारी (ता.२३) मतदान होणार आहे. मतदान शांततेत, निर्भय आणि पारदर्शक वातावरणात पार पडावे, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांच्या १०० मीटर परिसरात विविध निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
जिल्हादंडाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ मधील कलम १६३ अन्वये याबाबतचे प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित केले आहेत. यानुसार मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात राजकीय पक्षांची कार्यालये, उमेदवारांचे मंडप, सर्व दुकाने, विविध प्रकारच्या फेरीवाल्यांना परवानगी राहणार नाही. मोबाइल फोन, कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनिक्षेपके, इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. निवडणुकीच्या कामासाठी अधिकृत असलेल्या वाहनांव्यतिरिक्त खासगी वाहनांना या परिसरात प्रवेश करता येणार नाही. राजकीय पक्षांचे किंवा उमेदवारांचे निवडणूक चिन्ह प्रदर्शित करण्यासही मनाई करण्यात आली आहे. मतदानाच्या कामाशी संबंधित नसलेल्या व्यक्तींनाही या प्रतिबंधित परिसरात प्रवेश करता येणार नाही. हे प्रतिबंधात्मक आदेश गुरुवारी (ता.२२) रोजी सकाळी सहापासून लागू होतील. शुक्रवारी (ता.२३) मतदानाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हे आदेश अंमलात राहतील. या दिवशी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार आहे. मतदार, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, उमेदवार, कार्यकर्त्यांनी या आदेशांचे पालन करून निवडणूक प्रक्रिया शांततेत व शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
------------