नेते निवडणुकीत मस्त, आम्ही पाण्यासाठी त्रस्त; अर्धा दिवस पाणी शोधण्यात अन् अर्धा घरी आणण्यात

एकीकडे नेतेमंडळी निवडणुकीच्या प्रचारात अन् यंत्रणा मतदानाच्या कामकाजात व्यस्त असताना दुसरीकडे ग्रामीण भागातील मायमाऊली, बाया-बापड्या पिण्याचे पाणी शोधून शोधून त्रस्त झाल्या आहेत.
water crisis in chhatrapati sambhajinagar election lok sabha politics
water crisis in chhatrapati sambhajinagar election lok sabha politicsSakal

छत्रपती संभाजीनगर : एकीकडे नेतेमंडळी निवडणुकीच्या प्रचारात अन् यंत्रणा मतदानाच्या कामकाजात व्यस्त असताना दुसरीकडे ग्रामीण भागातील मायमाऊली, बाया-बापड्या पिण्याचे पाणी शोधून शोधून त्रस्त झाल्या आहेत.

दोन-दोन किलोमीटरवरून पाणी मिळविताना जिवाचे रान करावे लागते. कसरत करीत करीत कसाबसा हंडा भरतो. त्यांचा अर्धा दिवस पाणी कुठे मिळेल, हे शोधण्यात जातो, तर अर्धा दिवस ते पाणी घरापर्यंत आणण्यात जातो. सोयगाव तालुक्यातील हे चित्र प्रातिनिधीक आहे.

निवडणुका पाच वर्षांतून एकदा येतात, पण पाणीटंचाई तर नागरिकांच्या दरवर्षी पाचवीलाच पूजलेली आहे. आठ-दहा वर्षांच्या चिमुकलीपासून ते साठी पार केलेल्या महिलेसह सर्वांनाच पाण्यासाठी भटकंती करावी लागते. डोंगराच्या एखाद्या कोपऱ्यात पाणी सापडले, की त्यांना किती आनंद होत असेल! अगदी प्रचाराच्या सभेला भरभरून झालेली गर्दी पाहून नेत्याला होत असेल तितका!

जसजसा मतदानाचा दिवस जवळ येईल, तसतशी नेतेमंडळी एसी कारमध्ये फिरून या बायाबापड्यांच्या दारात मतांचे दान मागण्यासाठी येतील. मग मूलभूत समस्यांनी आधीच गांजलेली ग्रामीण जनता याचा जाब त्यांना विचारेल.

त्यावर नेतेमंडळी, त्यांचे चेलेचपाटे लगेच आश्वासनांचा मुलामा देतील आणि निघून जातील. मतदारराजा तेवढ्याला भुलून हक्क बजावेल आणि एकदा का निवडणुका झाल्या, की सारेकाही आलबेल असल्यासारखी स्थिती होईल. किमान यंदातरी असे होऊ नये, माऊलींचे कष्ट वाचावेत, यासाठी सर्वांनीच जागरूक राहायला हवे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com