छत्रपती संभाजीनगर - महापालिका निवडणुकीसाठी तिकीट आपल्याच हवे, असा दावा करणाऱ्या उमेदवारांची गर्दी झाली. अनेक प्रभागांत दहापेक्षा जास्त इच्छुक असल्याने राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढली..२९ प्रभागांत उमेदवारी देण्याचा दावा प्रमुख पक्ष करत असले तरी महायुती, महाविकास आघाडीच्या निर्णयानंतरच उमेदवार निश्चित होणार असून, त्यात काहींनी सर्वच पक्षांसाठी दारे खुली ठेवली आहेत. ‘कोणत्याही पक्षात जाऊ; पण उमेदवार म्हणून उभे राहू’ असा दावा केला जात आहे. इच्छुकांची गर्दी पाहता, राजकीय पक्षांना बंडखोरीची आतापासूनच भीती आहे..महापालिका निवडणुकीसाठी प्रशासकीय तयारीसोबतच राजकीय पक्षांनीही कंबर कसली आहे. यावेळची निवडणूक पहिल्यांदाच प्रभाग पद्धतीने होत असून, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षफुटीनंतरच्या बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकाऱ्यांचा कस लागणार आहे.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ३१ जानेवारीची डेडलाइन गृहीत धरून शहरात उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. भाजपतर्फे इच्छुकांचे अर्ज भरून घेतले जात आहेत. दोन दिवसांत सुमारे १,३०० जणांनी अर्ज केलेले आहेत. शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे इच्छुकांच्या याद्या तयार करण्यात आल्या..काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फेही इच्छुकांसाठी अर्जांचे वाटप सुरू आहेत. एका-एका जागेसाठी आठ ते दहा उमेदवार आमच्याकडे असल्याचा दावा सर्वच पक्ष करत आहेत. महापालिका निवडणुकीसाठी आचारसंहितेची घोषणा होईपर्यंत उमेदवारांची भाऊगर्दी सुरूच राहणार असून, निवडणुकीसाठी महायुती व महाविकास आघाडी होणार किंवा नाही, हे जोपर्यंत स्पष्ट होणार नाही, तोपर्यंत उमेदवारीचे चित्र स्पष्ट होणार नाही, असे सूत्रांनी सांगितले..दरम्यान, इच्छुकांची संख्या पाहता बंडखोरीची भीती असल्याने राजकीय पक्ष आतापासून सावधपणे पावले उचलत आहेत. सर्वांत पहिले मध्यवर्ती प्रचार कार्यालय सुरू करून शिवसेनेने तयारी सुरू केली. त्यानंतर भाजपने इच्छुकांचे अर्ज घेऊन एक पाऊल पुढे टाकले. इतर पक्षात मात्र फक्त अंतर्गत तयारी सुरू असल्याचे चित्र आहे..महायुती, महाविकास आघाडीचे तळ्यात मळ्यातमहापालिका निवडणुकीत २५ वर्षांपासून शिवसेना-भाजप युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी असे समीकरण होते. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर पहिल्यांदाच महापालिकेची निवडणूक होत आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिका, नगर परिषदांच्या निवडणुकीत युती आणि आघाडी नव्हती. त्यामुळे महापालिका निवडणुकीत काय चित्र राहील, याविषयी शंका उपस्थित केली जात आहे..भाजपमध्ये हौसे-नवसे-गवसेभाजपने ११५ जागांसाठी म्हणजेच २९ प्रभागांसाठी इच्छुकांकडून अर्ज भरून घेतले. त्यासाठी पक्ष कार्यालयात दोन दिवस तौबा गर्दी झाली. सुमारे १,३०० पर्यंत अर्ज आल्याचा दावा पक्षातर्फे केला जात असला तरी त्यात हौसे-नवसे-गवसे यांचाच भरणा जास्त आहे. निवडणूक रिंगणात तग धरणाऱ्या उमेदवारांची संख्या दीडशेच्या घरात असेल, असे सांगितले जात आहे..शिवसेना यूबीटी आर्थिक विवंचनेतवर्ष २०१५ मधील महापालिका निवडणुकीत शिवसेनेला सर्वाधिक २९ जागा मिळाल्या होत्या. तीन जण पुरस्कृत म्हणून निवडून आले होते. पक्ष फुटल्यानंतर यातील बहुतांश माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यात माजी महापौरांचाही समावेश आहे.त्यामुळे आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (यूबीटी) पक्षासाठी महापालिका निवडणूक अस्तित्वाची लढाई आहे. पक्षाने संभाव्य उमेदवारांच्या याद्या तयार केल्या असल्या तरी पक्ष किती आर्थिक पाठबळ देणार, असा प्रश्न अनेक उमेदवारांना पडला..काँग्रेसकडे २८५ अर्ज दाखलकाँग्रेसकडे आठ दिवसांत तब्बल २८५ अर्ज दाखल झाले. प्रत्येक प्रभागातून सरासरी दहा ते पंधरा अर्ज असल्याचा दावा पक्षाने केला. अनेक भागांत आजही काँग्रेसचे वर्चस्व असून, त्याचा दाखला देत स्वबळाची भाषा केली जात असली तरी अनेक जण महाविकास आघाडीस इच्छुक आहेत. आघाडी झाल्यास त्याचा फायदा पक्षाला होईल, असा दावा नेते करत आहेत..शिंदेंची शिवसेना पूर्वतयारीत मग्नमहापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने इच्छुक उमेदवारांना फॉर्म वाटप करण्याच्या कामात भाजपने आघाडी घेतली. त्यांचाच मित्र पक्ष असलेल्या शिंदे यांच्या शिवसेनेत तुलनेने सामसूम दिसत असली तरी पक्ष पूर्वतयारीच्या कामात लागल्याचे पदाधिकारी सांगतात. प्रभाग रचनेनंतरच्या याद्या वाटप, चाचपणी या प्रक्रिया सुरू आहे..पालकमंत्री संजय शिरसाट आणि आमदार प्रदीप जैस्वाल विधिमंडळ अधिवेशनानंतर शहरात परतल्यावर हालचालींना वेग येणार आहे. पक्षाच्या शहरातील बैठक आणि मेळावे सुरूच असून त्यातून इच्छुकांची नावेही समोर आली आहेत. जवळपास ९० टक्के नावे पक्षाकडे आली आहेत. असे असले तरी शिवसेनेचे डोळे इतर पक्षांतील खास करून भाजपमधील बंडखोरांकडे लागले आहेत.भाजपाकडे इच्छुकांची गर्दी असल्याने अनेक जणांना नाराजीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे शिवसेनेला अशा नाराजांना पक्षात घेऊन तिकीट देता येईल, अशी आशा आहे. प्रत्यक्षात नाव निश्चितीची प्रक्रिया झाल्यावरच हे कळणार असले तरी शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपवर डोळा आहे. मध्यंतरी शहरातील बडे पदाधिकरी भाजपमध्ये प्रवेश करते झाल्याने दुखावलेली शिवसेना आता भाजपवर ऐनवेळी घाव घालेल, असे बोलले जाते..एमआयएमचे आजपासून फॉर्म वाटपगेल्यावेळी महानगरपालिकेत विरोधी पक्ष असलेल्या एमआयएमने यंदाची निवडणूक ताकदीने लढवण्याची तयारी सुरू केली आहे. यावेळी केवळ मुस्लिमबहुल प्रभागांपुरते न राहता एमआयएम इतर प्रभागांमध्येही उमेदवार उभे करण्याची रणनीती आखत आहेत. दोन शिवसेना आणि भाजप यांच्यात होणाऱ्या मत विभाजनाचा काही मिश्र लोकवस्तीच्या प्रभागांत निश्चित फायदा होईल, असा एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांचा अंदाज आहे..माजी खासदार इम्तियाज जलील यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले, की उद्या (ता. १०) पासून पक्ष फॉर्म वितरण सुरू करणार असून ते १७ तारखेपर्यंत चालेल. त्यानंतर बाकी सारे निर्णय होतील. यंदा चाळणी लावून चांगले उमेदावर देऊन जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याची तयारी केली असल्याचे ते म्हणाले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.