(दसरा पान)
----
फोटो ः
परभणी ः भारतीय हवामान विज्ञान विभाग आणि कृषी विद्यापीठ यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानंतर हस्तांदोलन करताना डॉ. इंद्र मणी व विक्रम सिंह.
----
मराठवाड्यात उभारणार हवामान निरीक्षण प्रणाली
---
कृषी विद्यापीठ ः ‘आयएमडी’मध्ये सामंजस्य करार; शेतकऱ्यांना होणार मदत
---
सकाळ वृत्तसेवा
परभणी, ता. २० ः मराठवाड्यातील हवामान निरीक्षण अधिक सक्षम करून अचूक हवामान अंदाज, शेतकऱ्यांसाठी कृषी हवामान सल्ला सेवा प्रभावी करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. केंद्र शासनाच्या ‘मिशन मौसम उपक्रमा’अंतर्गत भारतीय हवामानशास्त्र विभाग (आयएमडी), मुंबई आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात एकात्मिक हवामान निरीक्षण प्रणाली उभारण्यासाठी नुकताच सामंजस्य करार झाला.
या करारानुसार विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वित कृषी हवामानशास्त्र संशोधन प्रकल्पाअंतर्गत अत्याधुनिक हवामान निरीक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. यामध्ये सी-बँड पोलॅरिमेट्रिक डॉप्लर हवामान रडार, पृष्ठभागीय हवामान वेधशाळा आणि रेडिओसॉन्ड वेधशाळा या तीन महत्त्वपूर्ण सुविधांचा समावेश असेल. रेडिओसॉन्ड प्रणालीद्वारे हवामान फुग्याच्या साह्याने वातावरणाच्या उच्च स्तरांवरील तापमान, आर्द्रता तसेच वाऱ्याचा वेग आणि दिशा यांची माहिती संकलित करता येणार आहे.
या सामंजस्य करारावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी आणि प्रादेशिक हवामान केंद्राचे (मुंबई) प्रमुख तथा वैज्ञानिक विक्रम सिंह उपस्थित होते. विद्यापीठाच्या वतीने डॉ. हरिहर कौसडीकर आणि डॉ. कैलास डाखोरे, तर हवामान विभागाच्या वतीने शंभू रवींद्रन, महेश बुरटे, पठाण यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. या सुविधेमुळे मराठवाड्यातील हवामानविषयक निरीक्षण आणि संशोधन क्षमतेत वाढ होईल, असा विश्वास कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी व्यक्त केला. हे केंद्र हवामान निरीक्षण, माहिती संकलन, विश्लेषण आणि अंदाजनिर्मितीसाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असे तर विक्रम सिंह यांनी नमूद केले.
---
शेती नियोजनाला मिळणार मदत
करारानिमित्त झालेल्या संवादात्मक सत्रात हवामान निरीक्षण, माहिती प्रक्रिया, अंदाजनिर्मिती आणि हवामानविषयक उत्पादनांचा कृषी क्षेत्रातील वापर याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. नव्या प्रणालीमुळे पेरणी, सिंचन, खत व्यवस्थापन, कीडरोग नियंत्रण आणि काढणीचे नियोजन करण्यासाठी अधिक उपयुक्त हवामान आधारित सल्ला विकसित करण्यास मदत होणार आहे. हवामानातील अनिश्चितता आणि अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर ही सुविधा मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे हवामानाशी संबंधित जोखीम कमी करून शेती अधिक सक्षम करण्याच्या प्रयत्नांना चालना मिळणार आहे.