
Sambhajinagar Crime : मित्रासोबत दुचाकीवर गेला अन् घात झाला!
छत्रपती संभाजीनगर : एका तरुणाने दुसऱ्यावर दोन वर्षापूर्वी चाकूने वार केला, अन् मित्रासोबत दुचाकीवर गेला. मात्र या घटनेत दुचाकीवरील तरुणाचाही सहभाग असावा या संशयावरुन तब्बल दोन वर्षांनी त्यावेळी जखमी झालेल्या तरुणाच्या मोठ्या भावाने दुचाकीवरील तरुणाचा चाकूने भोसकून खून केला.
ही घटना ३ मे रोजी मध्यरात्री बेगमपुऱ्यातील माळीवाडा गल्लीत घडली. गणेश सूर्यकांत पटारे (२७, रा. तारकस गल्ली, बेगमपूरा) असे त्या खून करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. तर विशाल कैलास शिंदे (२३, रा. माळीवाडा गल्ली, हनुमान मंदिराच्या मागे, बेगमपुरा) असे मृत तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी बेगमपुरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत विशाल शिंदे याचा लहान भाऊ कैलास शिंदे (१७) याने फिर्याद दिली. त्यानुसार विशालच्या मयूर नावाच्या मित्राने साधारण दोन वर्षापूर्वी वादातून आरोपी गणेश पटारे याचा लहान भाऊ योगेश पटारे याच्यावर चाकूने वार केले होते. दरम्यान चाकूने वार केल्यानंतर मयूर आणि विशाल हे एका दुचाकीवर बसून गेले होते. हा प्रकार गणेश पटारे याने पाहिला होता. तेव्हापासून भावावरील चाकूहल्ल्यात विशाल याचाही संबंध असावा असा संशय गणेश याला होता. दोन वर्षांपासून दोन विशाल याला मारण्यासाठी त्याच्यावर पाळत ठेऊन असे.
खून केल्यानंतरही मेल्याची खात्री करत मारहाण सुरुच
दरम्यान ३ मे रोजी विशाल गल्लीतील वाळूच्या ढिगावर बसलेला असताना आरोपी गणेश पटारे हा थेट चाकू घेऊनच आला. त्याने विशाल याच्या पोटावर, छातीवर, बरगडीत सपासप तब्बल सात मोठे वार केले. घटनेत विशाल गंभीर जखमी अवस्थेत खाली कोसळला. त्यानंतरही विशालचा जीव गेला की नाही याची खात्री करत गणेशने त्याला लाथा घालणे सुरुच ठेवले होते, जीव गेल्याची खात्री झाल्यानंतरच आरोपी गणेशने तिथून काढता पाय घेत फरार झाला.
ही घटना समजताच बेगमपुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी मृत विशालच्या भावाच्या फिर्यादीवरुन गणेशविरोधात बेगमपुरा पोलिसांत खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान तीन मे रोजी दुपारी चार वाजता उत्तरीय तपासणीनंतर मृत विशाल याचा मृतदेह कुटूंबियांच्या हवाली करण्यात आला. या घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक विशाल बोडखे करत आहेत.