esakal | औरंगाबादेत पांढरपेशा गुन्हेगारांनी घातला शेतकऱ्याला २५ लाखांचा गंडा
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

या फसवणूकीतील संशयित हे पांढरपेशे गुन्हेगार असल्याचेही समोर आले आहेत

औरंगाबादेत पांढरपेशा गुन्हेगारांनी घातला शेतकऱ्याला २५ लाखांचा गंडा

sakal_logo
By
सुषेन जाधव

औरंगाबाद: फ्लॅट देण्याच्या नावाखाली शेतकऱ्याला २५ लाख रुपयांना गंडविल्याचा प्रकारानंतर साधारणतः २ महिन्यापूर्वी सातारा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. विशेष म्हणजे या फसवणूकीतील संशयित हे पांढरपेशे गुन्हेगार असल्याचेही समोर आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे या प्रकरणात आतापर्यंत दोनवेळा तपास अधिकारी बदलण्यात आला आहे. हेच कमी की काय म्हणून पोलिसही फिर्यादी शेतकऱ्याला ‘तुम्हीच गुन्हेगाराला पकडून आणा, असे म्हणत असून पोलिस याकामी तपास करण्यास तयार नसल्याचा आरोप फिर्यादी शेतकऱ्याने सोमवारी (ता.६) पत्रकार परिषदेत केला.

याप्रकरणी फसवणूक झालेला शेतकरी गणेश रावण ढोबळे (रा. जांभळी, ता. पैठण) यांनी पत्रकार परिषदेदरम्यान आपबीती कथन केली की, गणेश यांची २ एकर जमीन डीएमआयसीमध्ये हस्तांतरीत करण्यात आल्यानंतर मोबदल्यापोटी त्यांना २०१९ मध्ये २५ लाख रुपये मिळाले होते. हे पैसे ढोबळे यांनी बँकेत एफडी केले होते. घर बांधायचे असल्याने गणेश हे प्लॉटच्या शोधात होते. दरम्यान योगेश उभेदळ, अशोक शेजूळ, सचिन जाधव यांनी आदित्य गारपगारेसोबत ओळख करुन दिली. पुढे गारपगारे याने शिक्षक मामा मंगेश भागवत याच्याशी संपर्क घडवून आणला. यानंतर भागवतने कांचनवाडीतील अजिंक्यतारा येथील अण्णासाहेब एकनाथ लोखंडे (३९, मुळ रा. टाकळीभान, नगर) याचा फ्लॅट दाखवला.

हेही वाचा: 'औरंगाबादेत ‘एम्स’, ‘आयआयटी’ उपकेंद्रासाठी प्रयत्न करणार'

ढोबळे यांना फ्लॅट पसंत पडल्यामुळे व्यवहार ठरविण्यात आला. यावेळी लोखंडेने फ्लॅटची २५ लाखांची रक्कम गारपगारे याच्या खात्यात आरटीजीएसव्दारे जमा करण्याचे सांगितले होते. तर इसारपावती पैसे घेण्यापुर्वीच केली होती. शेतकऱ्याला फसविण्यासाठी या टोळीत विपुल वक्कानी आणि पुण्यातील पोलीस कर्मचारी संदीप भगत यांनी मध्यस्थी केली. मात्र, वर्ष उलटून देखील लोखंडे याने ढोबळेंना फ्लॅट दिला नाही. उलट वर्षभरानंतर आपल्याला पैसे मिळाले नाहीत. असा कांगावा करत लोखंडे याने फ्लॅट देण्यास नकार दिला.

टोळीनेच केले संगनमत-
ढोबळे वारंवार पैशांची मागणी करत असल्यामुळे टोळीने संगनमत केले. लोखंडे याने ९ जानेवारी २०२१ रोजी सातारा पोलिसात तक्रारी अर्ज दिल्याचा बनाव केला. त्यात त्याने मंगेश भागवत याने मुंबईतील आरटीआय या सामाजिक संस्थेत पैसे गुंतविल्यास जादा परतावा मिळेल. असे आमिष लोखंडे यांना दाखविल्याचे म्हटले. पण लोखंडेने रोख नसल्याचे सांगताच फ्लॅटची इसारपावती करुन आलेली रकमेची गुंतवणूक करु असे भागवत म्हणाला होता. त्यासाठी ग्राहक शोधतो असे सांगत २५ लाखात ढोबळे यांना फ्लॅटची विक्री केल्याची कबुली तक्रारी अर्जात दिलेली आहे. तसेच यातील २५ लाखांपैकी दहा लाखांची रक्कम भागवतच्या मदतीने मुंबईच्या आरटीआय संस्थेत गुंतविल्याचेही म्हटले. मात्र, हा तक्रारी अर्ज पोलिसात दाखल करण्यात आलेला नाही. ढोबळेंना धमकावण्यासाठी या अर्जाचा वापर करण्यात आल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा: मतदानासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

वेगवेगळ्या बँकांमधून बनावट धनादेशाव्दारे कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी नगर स्थानिक गुन्हे शाखेने २२ एप्रिल २०२१ रोजी विपुल वक्कानी, त्याचे साथीदार राहुल गुळवे आणि पुण्याच्या एसआरपीएफ कॅम्पमधील पोलीस कर्मचारी संदीप भगत याला अटक केली होती. तर शिक्षण संस्थाचालक जगन्नाथ जाधव (जे. के. जाधव) यांनी ४ जून रोजी नवी मुंबईतील खारघर पोलिसात तक्रार दिली आहे. या तक्रारीत जाधव यांनी विपुल वक्कानी, देवीप्रसाद तिवारी, राहुल भगत आणि संदीप भगत यांनी आरटीआय संस्थेत पैसे गुंतविण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे म्हटले आहेत. विशेष म्हणजे या तक्रारीत मंगेश भागवतची ३५ लाख, गारपगारेची दहा लाख गुंतविल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे सातारा पोलिसात दिलेल्या तक्रारीअर्जानुसार, ढोबळे यांच्याकडून घेतलेल्या रकमेपैकी दहा लाख गुंतविल्याचे म्हटले आहे. पण जाधव यांच्या तक्रारीत आरटीआय संस्थेत ढोबळेंची देखील २५ लाखांची फसवणूक झाल्याचे म्हणणे आहे.

हेही वाचा: 'मराठवाड्याशी संबंधित कार्यालये औरंगाबादमध्ये आणू'

पोलिसांची हातावर घडी तोंडावर बोट-
तत्कालीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कार्यकाळात अशा गुन्हेगारांना बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. मात्र, आता पोलीस यंत्रणा गुन्हेगार पकडण्यासाठी तक्रारदारालाच शोध घ्यायला सांगत आहे. त्यामुळे पोलिसांचा गुन्हेगारांवरील वचक आता कमी होताना दिसत आहे. आतापर्यंत या प्रकरणात दोन तपास अधिकारी बदलण्यात आले आहेत.

loading image
go to top