esakal | औरंगाबादेत अवघ्या तीन तासांत संपल्या सहा हजार कोरोना लसी
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना लस

औरंगाबादेत अवघ्या तीन तासांत संपल्या सहा हजार कोरोना लसी

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद : शहरात कोरोना प्रतिबंधक लसींचा (Corona Vaccine) खेळखंडोबा सुरू आहे. सुमारे एक लाखापेक्षा अधिक नागरिकांची दुसऱ्या डोससाठी वेटींग असताना महापालिकेला शनिवारी (ता. २४) अवघ्या सहा हजार लसी मिळाल्या. त्यासाठी प्रशासनाला आरोग्य उपसंचालक कार्यालयाने रात्रभर ताटकळत ठेवले. दरम्यान मिळालेल्या लसींचे शहरात ३९ केंद्रांवर लसीकरण करण्यात आले. अवघ्या तीन तासात या लसी संपल्या. शहरात लसींचा तुटवडा कायम आहे. महापालिकेची (Auragabad Municipal Corporation) लाखो लसींचा मागणी असताना कधी पाच हजार, कधी सात हजार तर कधी दहा हजार लसी मिळत आहेत. त्यामुळे नागरिकांवर लस देता का लस... अशी ओरड करण्याची वेळ आली आहे. त्यात महापालिकेला कधी व किती लस मिळणार हे सांगण्याचे सौजन्य आरोग्य विभागातर्फे (Health Department) दाखविले जात नाही. अचानक लसीसाठी वाहन पाठविण्याचा निरोप दिला जातो.(within three hours corona vaccine finished in aurangabad glp88)

हेही वाचा: चिरमुड्या भाऊ-बहिणीचा गुदमरुन मृत्यू, आईवडीलांवर उपचार सुरु

पण किती लसी देणार याची माहिती दिली जात नाही. त्यामुळे केंद्रांचे नियोजन करताना महापालिकेची तारांबळ उडत आहे. शुक्रवारी महापालिकेला लस मिळणार एवढाच निरोप देण्यात आला. शुक्रवारी उपसंचालक कार्यालयाचे वाहन लस आणण्याठी पुण्याला गेले. मध्यरात्री ११.३० वाजता औरंगाबाद विभागासाठी ३३ हजार लसचा साठा देण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यातील पाच ते सात हजार लस महापालिकेच्या वाट्याला येतील हे नंतर सांगण्यात आले. त्यानुसार आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रात्र जागून काढली. पण लस मिळाली नाही. सकाळी १० वाजता महापालिकेला फक्त सहा हजार डोस देण्यात आले.

हेही वाचा: हिंगोली जिल्ह्यात गूढ आवाज, गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

केंद्रांवर उसळली गर्दी

सकाळी लस मिळताच महापालिकेने शहरातील ३९ केंद्रांवर लसीकरणाची व्यवस्था केली. दुसऱ्या डोससाठी मोठी गर्दी उसळली. युद्धपातळीवर शहरातील ३९ केंद्रांवर लसचा साठा वितरित करण्यात आला. दुपारी १२ वाजता लसीकरणाला सुरुवात झाली. काही केंद्रावर १०० तर काही ठिकाणी १५० व २०० असे डोस देण्यात आले. अवघ्या तीन तासात लस संपली. शहरात सुमारे एक लाख नागरिक दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांचे १०० ते १२५ दिवस उलटले आहेत पण दुसरा डोस मिळालेला नाही. दरम्यान सोमवारी (ता. २६) लस मिळेल किंवा नाही, याची शाश्‍वती नाही, असे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.

loading image
go to top