कामगार बनला कंपनीचा मालक | Aurangabad | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कामगार बनला कंपनीचा मालक!

औरंगाबाद : कामगार बनला कंपनीचा मालक!

औरंगाबाद : सलग दहा वर्षे कंपनीत काम केल्यानंतर अनुभव, जिद्द, मेहनतीतून ज्ञानेश्‍वर वैताळ या तरुणाने स्वतःची कोटिंग पत्रे तयार करणारी कंपनी उभी केली. कामगार ते कंपनीचा मालक असा त्यांचा थक्क करणार प्रवास आहे. कोरोनाच्या संकटकाळात त्यांनी हे धाडस केले आणि स्वस्तिक मेटल इंडस्ट्रीज उभी केली. कंपनीच्या त्या माध्यमातून १५ जणांना रोजगार दिला आहे.

हेही वाचा: महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रभागात विकासकामांचा धडाका

ज्ञानेश्‍वर रामराव वेताळ हे मूळचे जैतखेडा (ता. कन्नड, जि. औरंगाबाद) येथील असून दहावीपर्यंत शिक्षण झाले. बाजार सावंगी येथे त्यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतले. घरच्या दहा एकर कोरडवाहू शेतीतून चांगल्या उत्पादनाची हमी नसल्याने त्यांनी बारावीनंतर वर्ष २००६ मध्ये औरंगाबादेतील एका घाऊक किराणा दुकानात काम करायला सुरवात केली. या काळात किराणा दुकानमालकाने वाळूज आणि शेंद्रा येथे पत्र्यांचा व्यवसाय, प्लॅंट सुरू केले. ज्ञानेश्‍वर वेताळ हे तेथे कामाला गेले. काम करत असताना पत्रा व्यवसाय, त्याचे मार्केट, ग्राहक, उलाढाल आणि ग्राहकांच्या गरजा आदींचा दहा वर्षे अनुभव त्यांना आला. त्यानंतर स्वतःचा कोटिंग पत्रे तयार करण्याचा प्लॅंट उभारण्याचा विचार केला.

मामाचा सल्ला आणि साथ

नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा सल्ला ज्ञानेश्‍वर वेताळ यांना त्यांचे मामा बाबासाहेब साळुंके यांनी दिला आणि पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचा शब्द दिला. त्यानुसार २०१९ मध्ये वेताळ यांनी नोकरी सोडून २०१९ मध्ये वाळूज येथे स्वस्तिक स्टील ॲण्ड हार्डवेअरचे दुकान सुरू केले. स्वतःचा प्लॅंट उभा करण्याचे मनात होतेच. यासाठी साळुंके यांनी त्यांना सर्व प्रकारची मदत केली. २०२० मध्ये ज्ञानेश्‍वर यांनी मामाच्या साहाय्याने स्वस्तिक मेटल इंडस्ट्रीजची स्थापना केली. कोटिंग पत्रे तयार करणारी यंत्रणा राजकोटमधून (गुजरात) मागविली. २०२० पासून उत्पादन सुरू केले.

हेही वाचा: औरगाबाद : पाडापाडीसाठी प्रशासन सज्ज

मार्केट, ग्राहकांच्या गरजांचा अभ्यास

अलीकडे बांधकाम साहित्य महाग होत आहे. ते कित्येकांना परवडत नाही. पर्याय म्हणून अनेक जण कोटिंग पत्र्याचे शेड उभे करतात. मोठ्या कंपन्यांचे प्लॅंटही कोटिंग पत्र्याद्वारे तयार होत आहेत. घरांसाठी वापर होऊ लागला आहे. पत्र्यामुळे खर्च कमी होतो, वेळही वाचतो. त्यामुळे मागणी वाढती आहे. नोकरीतून मिळालेला अनुभव, मार्केट, ग्राहकांच्या गरजा, उलाढाल, ऑर्डर कशा व कुठून मिळतात याचा अभ्यास ज्ञानेश्‍वर वेताळ यांनी केला. ग्राहकांच्या गरज लक्षा घेऊन त्यांनी हे धाडस केले आणि ते यशस्वी झाले.

पत्र्यांना मोठी मागणी

ज्ञानेश्‍वर यांच्या प्लँटमध्ये दिवसभरात ३० ते ४० टनापर्यंत कोटिंग पत्रे तयार होऊ शकतात. पण मागणीनुसार पत्रे तयार करून देण्यावर त्यांचा भर आहे. पत्र्याशिवाय ते स्ट्रक्चरचे रिटेलिंगही करतात. सध्या पत्र्याला राज्यभरातून मोठी मागणी आहे. मराठवाड्यात पत्रा जास्त विकला जातो. बारावीपर्यंत शिक्षण झाले असले तरी ज्ञानेश्‍वर यांनी आपल्या कंपनीद्वारे १५ जणांना रोजगाराची संधी दिली आहे, हे विशेष.

loading image
go to top