
Aurangabad News | हळद सुकण्यापूर्वीच तरुणाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
पाचोड (जि.औरंगाबाद) : एक महिन्यापूर्वी लग्न झालेल्या सव्वीस वर्षीय तरूणाने अंगावरील हळद निघण्यापूर्वीच रागाच्या भरात विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना पाचोड खूर्द (ता.पैठण) येथे शनिवारी (ता.सात) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. विजय बाबासाहेब घुले (रा.पाचोड खुर्द, ता.पैठण) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पाचोड (Pachod) खुर्द येथील विजय घुले यांचे महिनाभरापूर्वी लग्न झाले होते. हे पती - पत्नी सुखी संसाराची सोनेरी स्वप्नं रंगवत असताना घरातील किरकोळ गोष्टीच्या क्षणिक रागाने त्यांचे स्वप्न उद्धवस्त करून गेले. मंगळवारी (ता.तीन) घरांत किरकोळ कारणावरून विजयचा वाद झाला,अन् त्याने कुणाला काही एक न सांगता तो बाहेर गेला. (Youth Jump Into Well And End Himself In Pachod Of Aurangabad)
हेही वाचा: Aurangabad News | पैठणमध्ये पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू
त्यांनी आजुबाजूला विजयचा शोध घेतला. मात्र तो सापडून आला नाही. त्यामुळे कुटुंबियांना तो नातेवाईकाकडे गेला असावा असा समज झाला व त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. शनिवारी (ता. सात) गावांतील काहीजण रस्त्याने आपल्या शेतात जात असताना त्यांना रस्त्यालगत वेड्या बाभळीने विळखा घातलेल्या वापरा विना पडीत पडलेल्या विहीरीतून त्याना दुर्गंधीयुक्त वास आल्याने त्यांनी विहीरीकडे जाऊन त्यात डोकावून पाहिले असता एक मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे दिसले. त्यांनी गावांत येऊन ग्रामस्थांना या घटनेची माहिती दिली. माहीती मिळताच ग्रामस्थांसह पोलिस पाटील दिलीप वाघ, उपसरपंच नितीन वाघ यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस पाटील दिलीप वाघ यांनी पाचोड पोलिसांना या घटनेची माहिती दिली. तोच पोलिस नाईक संतोष चव्हाण, रविंद्र आंबेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह विहीरी बाहेर काढण्यात आला. तोच मृतदेह पाहुन उपस्थित नातेवाईकांनी हंबरडा फोडला. मृतदेह कुजलेले असल्याने उत्तरणीय तपासणीसाठी पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांना बोलविण्यात आले. मात्र त्यांनी घटनास्थळी उत्तरीय तपासणी करण्यास नकार देऊन सदरील जबाबदारी नांदर (ता.पैठण) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्याची असल्याचे सांगितले. (Aurangabad)
हेही वाचा: राज ठाकरे यांची सगळी आंदोलने अपयशी ठरली; अजित पवार
पोलिसांनी नांदर येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना यासाठी पाचारण केले असता त्यांनीही हद्दीचे कारण पुढे करीत जबाबदारी झटकली. ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जबाबदारी झटकण्याच्या कारणामुळे उत्तरणीय तपासणीस तासभराचा उशीर झाला. अखेर ग्रामस्थांनी आक्रमक भुमिका घेताच ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय डॉ. साबळे यांनी घटनास्थळावर येऊन उत्तरीय तपासणी केल्यानंतर वाद निवळला. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा करून यासंबंधी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली असून पुढील तपास सहायक पोलिस निरिक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक रविंद्र आंबेकर, संतोष चव्हाण करीत आहे. अंगावरील हळद निघण्यापूर्वीच मृत विजयच्या पत्नीच्या नशिबी वैधव्यपण आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Web Title: Youth Jump Into Well And End Himself In Pachod Of Aurangabad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..