

Ausа Drought Crisis
esakal
औसा : आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी अखेर निराशाच आली आहे. दोन महिन्यांपासून पावसाने पाठ फिरवल्याने ऐन फुलोरा आणि शेंगांमध्ये दाणा भरण्याच्या अवस्थेतील सोयाबीन करपून गेले आहे. रान हिरवे दिसण्याऐवजी आता काळवंडले आहे. उभ्या पिकावर केलेला हजारो रुपयांचा खर्च वाया गेला असून, काढणीचा खर्चही निघण्याची शक्यता नाही. अशा परिस्थितीत आता शेतकऱ्यांची नजर आभाळाकडे नाही, तर सरकारच्या निर्णयाकडे लागली आहे.
शिवली (ता. औसा) येथील शेतकरी इस्माईल तांबोळी यांनी आपल्या शेतातील परिस्थिती मांडताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आर्त साद घातली आहे. “बारा एकरावर सोयाबीनची पेरणी केली. ऐन फुलोरा आणि शेंगात दाणा भरण्याच्या वेळेला दोन महिन्यांचा पावसाचा खंड पडला आणि संपूर्ण सोयाबीन सुकून गेले. ज्वारीच्या दाण्याएवढे सोयाबीन निपजले आहे. एकरी दोन कट्ट्यांच्या वर उतारा मिळेल असे वाटत नाही. उलट काढणीसाठीच एकरी पाच हजार रुपये खर्च येणार आहे. मग आम्ही काय करायचे?” असा सवाल त्यांनी केला.
पेरणीपूर्वी बियाणे, खते, पेरणी, मशागत, फवारण्या, तणनियंत्रण यासाठी पैसा खर्च केला. पीक उभे राहिले म्हणून उत्पादनाची आशा होती; मात्र पावसाने साथ सोडताच संपूर्ण गणितच कोलमडले. “सगळीकडून आम्ही उघडे पडलोय. खर्च अंगलट आला आहे. आता वर्षभर जगायचे कसे?” हा प्रश्न तांबोळी यांच्यासह हजारो शेतकऱ्यांसमोर उभा आहे.
शेतकऱ्यांच्या मनातला संताप आता एका प्रश्नाभोवती केंद्रित झाला आहे—दुष्काळ जाहीर करण्यासाठी पाच तारखेचा मुहूर्त कशासाठी?
पाऊस पडेल, अशी आशा ठेवून सरकार आणखी किती दिवस वाट पाहणार? पाऊस पडला तरी आतापर्यंत करपलेली सोयाबीन, उडीद, ज्वारी आणि इतर खरीप पिके पुन्हा उभी राहणार आहेत का? असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत. उपलब्ध वृत्तांनुसार राज्य सरकारने दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन केली असून, पंचनामे व मदतीसाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
मात्र शेतकऱ्यांचे म्हणणे स्पष्ट आहे—आता पाऊस पडला तरी खरीप वाचणार नाही; सरकारची मदतच शेतकऱ्यांना वाचवू शकते.
“रान करपून गेलंय. शेतात उभं पीक नाही, उत्पादनाची आशा नाही. घरात खर्चाची जबाबदारी आहे. मुलांचे शिक्षण, कुटुंबाचा उदरनिर्वाह, कर्जाचे हप्ते यांचा प्रश्न आहे. त्यामुळे आता सरकारच्या निर्णयाकडे डोळे लागले आहेत,” अशी भावना तांबोळी यांनी व्यक्त केली.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केवळ पंचनाम्यांच्या आकड्यांमध्ये अडकवू नये, अशी मागणी आता जोर धरत आहे. ज्या भागात पिके करपली आहेत, तेथे सरसकट मदत, पीकविमा, पाणी व चाऱ्याची व्यवस्था आणि शेतकऱ्यांना तातडीचा आर्थिक आधार देण्याची मागणी होत आहे. सरकारने यापूर्वी नुकसानग्रस्त भागात प्रत्यक्ष शेतपातळीवर सर्वेक्षण करण्याचे आदेश दिल्याचेही वृत्त आहे.
शेतकऱ्यांच्या मते, मदत जाहीर होण्यासाठी कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण होण्याची वाट पाहत बसण्यापेक्षा प्रत्यक्ष परिस्थिती लक्षात घेऊन तातडीने निर्णय होणे गरजेचे आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर इस्माईल तांबोळी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
“देवाभाऊ, शेतकऱ्यांसाठी देवदूत बना. राजकीय चाल खेळण्यापेक्षा शेतकऱ्यांचा दुवा घ्या. आमच्या डोळ्यांसमोर रान करपलंय. आता आम्हाला आश्वासन नको, निर्णय हवा. सरसकट मदत द्या. शेतकरी जगवायचा असेल तर आत्ताच निर्णय घ्या,” अशी हात जोडून विनंती त्यांनी केली.
शेतकऱ्यांसाठी आजचा प्रश्न केवळ एका हंगामाच्या नुकसानीचा नाही. पिकात गेलेला पैसा, पुढील हंगामासाठी लागणारे भांडवल आणि कुटुंबाचा वर्षभराचा खर्च या सगळ्याचे गणित विस्कटले आहे. त्यामुळे सरकारने दुष्काळाच्या निकषांवर प्रक्रिया करताना शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष शेतातील परिस्थितीचा विचार करून तातडीने मदतीचा निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा आहे.
आभाळाने साथ सोडली आहे... आता सरकारने शेतकऱ्यांची साथ सोडू नये. रान करपले आहे; पण शेतकऱ्यांची आशा अजून जिवंत आहे. ती आशा सरकारच्या निर्णयानेच टिकणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.