हे पुरस्कार म्हणजे लेखन कलाकृतीचे फळ - बाबा भांड

प्रकाश बनकर
शनिवार, 8 एप्रिल 2017

औरंगाबाद - "दुसऱ्याच्या मरणावर उदरनिर्वाह असणाऱ्यांवर आधारित "दशक्रिया' या सिनेमातून एक वेगळा विषय मांडण्यात आला आहे. जात-पात, धर्म सर्वांना एकाच ठिकाणी घेऊन येणारा "पोट' हा विषय यातून हाताळण्यात आला. त्यामुळे कादंबरी लेखनाच्या कलाकृतीचे फळ म्हणजे हे पुरस्कार आहेत, अशी प्रतिक्रिया "दशक्रिया' कादंबरीचे लेखक, ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांनी दिली.

औरंगाबाद - "दुसऱ्याच्या मरणावर उदरनिर्वाह असणाऱ्यांवर आधारित "दशक्रिया' या सिनेमातून एक वेगळा विषय मांडण्यात आला आहे. जात-पात, धर्म सर्वांना एकाच ठिकाणी घेऊन येणारा "पोट' हा विषय यातून हाताळण्यात आला. त्यामुळे कादंबरी लेखनाच्या कलाकृतीचे फळ म्हणजे हे पुरस्कार आहेत, अशी प्रतिक्रिया "दशक्रिया' कादंबरीचे लेखक, ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांनी दिली.

केंद्र सरकारच्या 64 व्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये "दशक्रिया' या सिनेमाला उत्कृष्ट मराठी सिनेमा, उत्कृष्ट पटकथा लेखनासाठी संजय कृष्णाजी पाटील आणि उत्कृष्ट सहायक कलाकार मनोज जोशी यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. याच सिनेमाविषयी ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांच्याशी "सकाळ'ने संवाद साधला. बाबा भांड यांनी 1995 मध्ये लिहिलेल्या "दशक्रिया' या कादंबरीवर दिग्दर्शक संदीप पाटील यांनी "दशक्रिया' सिनेमा केला.

मरणानंतर घाटावर होणारे विधी आणि त्यांवर अवलंबून असलेल्या लोकांविषयीचे वास्तव "दशक्रिया'ने मांडले. पुणे चित्रपट महोत्सवात हा सिनेमा उत्कृष्ट ठरला. यात भान्याची भूमिका साकारलेला आर्य आढाव उत्कृष्ट बालकलाकार ठरला. बाबा भांड म्हणाले की, हा पुरस्कार मिळाल्याचे ऐकल्यानंतर खूप आनंद झाला, वाचकांपर्यंत लिखित स्वरूपात गेलेली कलाकृती संजय पाटील व संदीप पाटील यांनी सिनेमाच्या माध्यमातून पोचवली. भानुदास नावाच्या विद्यार्थ्यांवर सिनेमाची कथा गुंफलेली आहे. शिक्षण घेण्याची इच्छा असणारा भानुदास दशक्रियेच्या राखेतून पैसे मिळवतो. त्याचा संघर्ष यातून दाखविला आहे.

लेखक एखादा विषय शब्द स्वरूपातून मांडतो. तोच विषय चित्रपटातून मांडणे हे आव्हान आहे. हा विषय देशातील कोणत्याही साहित्यात घेण्यात आलेला नाही. संदीप पाटील व संजय कृष्णाजी पाटील यांनी हा सिनेमा मूळ कथेची मोडतोड न करता केला आहे. सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळेलच अशी खात्री होती. या कादंबरीत एखादा समाज किंवा धर्माबद्दल लिहिलेले नसून वास्तव मांडले आहे, असेही बाबा भांड यांनी सांगितले.

हा माझा पहिला पुरस्कार - मनोज जोशी
पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर अभिनेते मनोज जोशी यांचा बाबा भांड यांना फोन आला. बाबा, तुमच्यामुळेच मी ही भूमिका सहज करू शकलो. या सिनेमामुळे मिळालेला पुरस्कार हा माझा पहिला राष्ट्रीय पुरस्कार असल्याचे अभिनेता मनोज जोशी यांनी सांगितले.

सिनेमात शहरातील प्रसिद्ध छायाचित्रकार किशोर निकम यांनी फोटोग्राफी केली. तसेच एरियल शूट आणि पोस्टर डिझाइनसह सिनेमाच्या शीर्षकाचे कामही केले आहे. तसेच सिनेमात त्यांनी छोटीशी भूमिकाही साकारली आहे.

Web Title: This award is the fruit of artwork